निफाड तालुक्यात महसूल विभागाचा धडाका सुरूच ; तीन ठिकाणी विनापरवाना गौणखनिज वाहतूक करणारी वाहने जप्त…कुणावर झाली कारवाई..?

वेगवान नाशिक / किरणकुमार आवारे
शिरवाडे वाकद दिनांक ८ डिसेंबर २०२५ :- नाशिक – छत्रपती संभाजीनगर मार्गासह चांदोरी, कसबे सुकेणे व सायखेडा परिसरात महसूल विभागाने सलग तीन कारवायांमध्ये विनापरवाना गौणखनिज वाहतूक करणारे डंपर व हायवा जप्त केले. दोन दिवसांत झालेल्या या कारवायांमुळे अवैध वाहतूकदारांचे धाबे दणाणले आहेत.
निफाडचे तहसिलदार मा.विशाल नाईकवाडे यांचे नेतृत्वाखाली मंडळ अधिकारी रूपाली सावळे, मंडळ अधिकारी जयंत लिलके, तलाठी कैलास शांताराम आहिरे, ग्राममहसूल अधिकारी अबोली प्रदीप साळवे, रोशनी पटेल, पूर्वा राठोड तलाठी वर्हेदारणा यांचे पथकाने ही कारवाई केली. या कारवाईत दिनांक ७ डिसेंबर रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास चांदोरी – कसबे सुकेणे रस्त्यावरील माऊली ढाब्याजवळ एम.एच १५ जे.डब्ल्यू ७७०१ क्रमांकाच्या डंपरमधून १ ब्रास कच अंदाजे किंमत ३२५० रु.विनापरवाना वाहतूक होत असल्याचे आढळले. चालक किरण दिलीप लांडगे, रा.कसबे सुकेणे याने कच कोठून आणला आणि मालक कोण याबाबत समाधानकारक माहिती दिली नाही. याच दिवशी दुपारी साडेबारा वाजता सायखेडा परिसरातील हरे राम पेट्रोल पंपाजवळ अमोल बाळू फड, रा.महाजनपूर व विशाल धोंडीराम कापसे, रा.भेंडाळी हे दोघे मिळून नंबर प्लेट नसलेल्या हायवा मधून ६ ब्रास अवैध गौणखनिज (किंमत अंदाजे रु. ३६ हजार) वाहतूक करताना आढळून आले.
दिनांक ८ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी अकराच्या सुमारास चांदोरी चौफुली येथे महसूल पथकाने एम.एच १५ जे.डब्ल्यू ०७०१ हा डंपर अडवून तपासणी केली. या डंपरमध्ये १ ब्रास वॉशसॅन्ड कच, अंदाजे किंमत ३,२५० रु.विनापरवाना वाहतूक होत असल्याचे आढळून आले. चालक अर्जुन रमेश जाधव, रा.सरदवाडी, ता.सिन्नर याच्याकडे परवाना नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे सदर वाहनांचे पंचनामे करून सायखेडा पोलिस ठाण्यात जमा करण्यात आले असून संबंधित आरोपींच्या विरोधात भा.न्या.स २०२३ कलम ३०३(२) मो. वा.का कलम ३९/१९२ (१) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अवैध खनिज वाहतूकदारांवर कडक कारवाई सुरूच राहणार असल्याची माहिती निफाडचे तहसिलदार मा.विशाल नाईकवाडे यांनी दिली आहे. एका सप्ताहात तब्बल सात सलग कारवायांमुळे अवैध वाहतूक करणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.



