
वेगवान नाशिक / किरणकुमार आवारे
शिरवाडे वाकद दिनांक २४ नोव्हेंबर २०२५ :- लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक परिक्षेत्राच्या पथकाने केलेल्या कारवाईत सिन्नर एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक राजु ब्रिजलाल पाटील (वय ४२) यांना १ लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. या प्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ चे कलम ७ अन्वये गुन्हा नोंद प्रक्रिया सुरू आहे.
तक्रारदार यांचे मुलाविरुद्ध दाखल गुन्ह्यात वाढीव पीसीआर न मागणे, लवकर जामीन होण्यासाठी सहाय्य करणे आणि चार्जशीट दाखल करतेवेळी केस कच्ची करण्याच्या बदल्यात पाटील यांनी २३ नोव्हेंबर २०२५ रोजी १ लाख ६० हजारांच्या लाचेची मागणी केली होती.
तडजोडीनंतर १ लाख रुपये देण्याचे ठरल्यानंतर २४ नोव्हेंबर रोजी सापळा कारवाई करण्यात आली. सिन्नर एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्याच्या आवारात तक्रारदाराकडून पंचासमक्ष लाचेची रक्कम स्वीकारताच पाटील यांना ताब्यात घेण्यात आले.
ही कारवाई मा.श्री भारत तांगडे, पोलीस अधीक्षक, मा.श्री.माधव रेडी, अपर पोलिस अधीक्षक,मा. श्री. सुनील दोरगे, अपर पोलीस अधीक्षक, पोलीस उपअधीक्षक सुरेश भिकाभाऊ शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली पो. हवा. पंकज पळशिकर, पो. हवा. प्रमोद चव्हाणके आणि पो. अ. योगेश शिंदे यांच्या पथकाने केली.
या प्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ चे कलम ७ प्रमाणे गुन्हा नोंद प्रक्रिया सुरू असून पुढील तपास सुरू आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणताही लोकसेवक लाच मागत असल्यास तात्काळ विभागाशी संपर्क साधावा.



