वाहनाची चावी गाडीला ; दुर्लक्षाने कोवळा जीव गमावला ; वाहनास चावी ठेवू नका – स.पो.नि भास्करराव शिंदे यांचे आवाहन

वेगवान नाशिक / किरणकुमार आवारे
शिरवाडे वाकद दिनांक २२ नोव्हेंबर २०२५ :- खडकमाळेगाव ता.निफाड येथे दारात उभी असलेली मोटारसायकल विनापरवानगी नेल्याने झालेल्या भीषण अपघातात अल्पवयीन तरुणाचा मृत्यू झाला आहे.
या प्रकरणी मोटारसायकल मालक दिगंबर बाळु वाघ, रा. खडकमाळेगाव यांनी लासलगाव पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत, त्यांनी घरगुती वापरासाठी बजाज कंपनीची प्लॅटीना मोटारसायकल (एम.एच.१५ ई.वाय.१७१३) घेतली आहे. ती घराच्या दारात उभी होती. त्यावेळी मोटारसायकलची चावीही त्यातच ठेवलेली होती. दरम्यान, शेजारी राहणारा तन्मय सोमनाथ जाधव, वय १७ हा कोणालाही न सांगता मोटारसायकल घेऊन लासलगावकडे निघाला. वाहन चालवण्याचा पुरेसा अनुभव नसल्याने खाणगाव रोडवरील वळणावर वेग नियंत्रित करू न शकल्याने मोटारसायकल घसरली व रस्त्याच्या नालीत जाऊन पडली. या गंभीर अपघातात तन्मयच्या डोक्यास, तोंडास, छातीस व कमरेस गंभीर दुखापत झाली असून उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. तसेच अपघातात मोटारसायकलचे मोठे नुकसान झाले आहे असा आरोप केला आहे. त्यांचे फिर्यादीवरून मयत युवकाच्या विरोधात गु.रं.नं.२६२/२०२५ भा.न्या.संहिता कलम १०६ (१), २८१, १२५(अ) १२५ (ब), मो.वा.का.क १८४, १८१, १,३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स.पो.नि भास्करराव शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली पो.हवा.उत्तम गोसावी अधिक तपास करीत आहेत.
अल्पवयीनांकडून वाहन चालवणे हा गंभीर गुन्हा आहे. अपघात झाला तर जबाबदारी पालकांची व वाहनमालकाची ठरते. मुलांना वाहन देणे म्हणजे त्यांच्या आणि इतरांच्या जीवाशी खेळणे होय. अशा प्रकरणांवर पोलिसांकडून कठोर कारवाई केली जाईल.
– भास्करराव शिंदे
सहाय्यक पोलिस निरीक्षक लासलगाव



