
वेगवान नाशिक / बाबा पवार
देवळा : देवळा तालुक्याच्या पूर्व भागाचा शेतीसिंचनाचा प्रश्न कायमस्वरुपी मार्गी लागावा यासाठी चणकापूर उजवा कालव्याअंतर्गत रामेश्वर धरण ते चिंचवे या २६ किमी.पर्यंतच्या रुंदीकरण व अस्तरीकरण करून कालव्याची वहनक्षमता वाढविण्याच्या कामासाठी ६५ कोटी रुपयांचा निधी मंजूर होऊन सदर कामाची निविदा प्रसिद्ध झाली आहे. या कामाला लवकरच सुरुवात होणार असून यामुळे सुमारे १६ हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार असल्याची माहिती आमदार डॉ.राहुल आहेर यांनी शनिवार (ता.२२) रोजी दिली.
याबाबत अधिक माहिती देताना आमदार डॉ.आहेर यांनी सांगितले की, हे महत्वाकांक्षी काम पुढील एक वर्षात पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे. या कालव्यासाठी एकूण १८ विमोचक ( गेट) बसविण्यात येणार असल्याने छोटी मोठी पाझर तलाव भरून त्याचा लाभ शेतीला होणार आहे. रामेश्वर ते झाडी या चणकापूर उजवा वाढीव कालव्याची सध्याची वहनक्षमता ८७ क्युसेक इतकीच आहे मात्र या नव्याने प्रस्तावित कामामुळे ती २६५ क्युसेक इतकी होणार आहे. तर झाडी येथील पुच्छ वहनक्षमता जी १३.८० क्युसेक आहे ती आता १०८ क्यूसेस इतकी होणार आहे.
या अगोदर या वाढीव कालव्याला फक्त पूरपाण्याचीच मान्यता होती परंतु आता नारपार योजनेमध्ये समाविष्ट केल्यामुळे सदर कालवा हा आठमाही होऊन शेतीसिंचनासाठी त्याचा उपयोग होणार आहे. यामुळे ११ हजार ५०० हेक्टर क्षेत्र शाश्वत सिंचनाखाली येईल. शेतीपाण्याबरोबर पिण्याच्या पाण्याच्या योजनांनाही त्याचा लाभ होणार असल्याने हे काम दुष्काळी भागासाठी वरदान ठरणार आहे.
या नंतरच्या दुसऱ्या टप्प्यात चणकापूर ते रामेश्वर या उजव्या कालव्याच्या ३८ किलोमीटरच्या विस्तारीकरणा साठी अतिरिक्त निधी उपलब्ध करून याचीही वहनक्षमता वाढवली जाणार आहे. यामुळे या कालव्याची वहनक्षमता १८४ क्युसेकवरून ती वाढवून आता ४२७ क्युसेक करणे प्रस्तावित आहे. तर रामेश्वर धरण येथे टेल ला पूर्वीची ८८ क्युसेक असलेली वनक्षमता २६० होणार आहे.



