नाशिक ग्रामीण

महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावणारा आरोपी जेरबंद ; निफाड पोलिसांची वेगवान कारवाई

वेगवान नाशिक / किरणकुमार आवारे

शिरवाडे वाकद दि.१३ नोव्हें २०२५ :- निफाड तालुक्यातील नांदुर्डी शिवारात दिनांक ११ नोव्हेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास एका महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून पळालेल्या चोरट्याला निफाड पोलिसांनी केवळ पाच तासांत जेरबंद करत गुन्हा उघडकीस आणला आहे.
फिर्यादी महिला आपल्या घरामागे नळाचे पाणी भरत असताना, एक अनोळखी इसम पिण्याचे पाणी मागण्याचा बहाणा करून तिच्याजवळ आला. त्यानंतर त्या इसमाने तिच्या गळ्यातील सोन्याची वाट्याची, डोरल्याची आणि मन्यांची साखळी जबरदस्तीने हिसकावून मोटारसायकलवर बसून पसार झाला. महिलेच्या फिर्यादीवरून निफाड पोलिस ठाण्यात गु.र.नं. ३६८/२०२५, भा.दं.वि. कलम ३०९(४) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेची माहिती मिळताच नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. के. के. पाटील यांनी तातडीने तपासाचे आदेश देत आरोपीला अटक करण्याच्या सूचना दिल्या. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गणेश गुरव यांच्या नेतृत्वाखालील पथकाने निफाड शहर व परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यातून मिळालेल्या संशयिताच्या चित्रांच्या आधारे आणि गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सचिन सुदाम ठेपले (रा. नांदुर्डी रोड, निफाड) याला शिताफीने ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याकडून चोरीस गेलेला सोन्याचा मुद्देमाल, गुन्ह्यावेळी वापरलेले कपडे आणि दुचाकी हस्तगत करण्यात आली. निफाड पोलिसांनी ही कारवाई केवळ पाच तासांत यशस्वीरित्या पार पाडली.
या तपास पथकात पो.उ.नि. विजय गायकवाड, पो.उ.नि. विश्वनाथ निकम, पो.ह.वा. अनिल शेरेकर, पो.ह.वा. भास्कर पवार, पो.ना. नितीन सांगळे, पो.शि.विनोद जाधव, पो.शि. राजू दरोडे, पो.शि. धनंजय जाधव, पो.शि. सिद्धार्थ वाघ, म.पो.ना. ललिता कोकणे, म.पो.ह.वा. पूनम शिंदे यांचा समावेश आहे.
नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निफाड पोलिसांनी दाखवलेली ही तत्परता आणि व्यावसायिकता सर्वत्र कौतुकास्पद ठरत आहे.

 

किरणकुमार आवारे

किरणकुमार आवारे हे गेली ३० वर्षांपासून प्रिंट मीडियात काम करत आहेत. याकाळात त्यांनी दैनिक देशदूत, दैनिक लोकमत, दैनिक गांवकरी, दैनिक उलाढाल, दैनिक तरुण भारत, दैनिक सार्वमत, दैनिक आधुनिक केसरी, दैनिक लक्ष महाराष्ट्र, लोकनामा मध्ये काम केले आहे व करत आहेत. दैनिक लोकनामा मध्ये त्यांनी सलग १५० भाग गावगाडा हे सदर चालवले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!