नाशिक ग्रामीण

छ. संभाजीनगर हायवेवर वाहनचालकास मारहाण करून मोबाईल व दहा हजारांची रक्कम लुटणारे आरोपी जेरबंद; निफाड पोलिसांची भरधाव कामगिरी

वेगवान नाशिक / किरणकुमार आवारे

शिरवाडे वाकद, दिनांक १७ नोव्हें २०२५ :- निफाड पोलीस ठाणे हद्दीत दिनांक ११ नोव्हेंबर २०२५ रोजी रात्री सुमारे ११.३० वाजता नाशिक – निफाड रोडवरील जळगाव फाटा येथील कादवा नदी पुलाजवळ दोन अज्ञात आरोपींनी ट्रॅक्टर अडवून चालकाला मारहाण करत मोबाईल व रोख १० हजार रुपये लुटल्याची घटना घडली होती. फिर्यादी डाव्या पायाने अपंग असतानाही आरोपींनी बजाज डिस्कव्हर मोटारसायकल आडवी लावत ट्रॅक्टर थांबवला. त्यानंतर लाल स्वेटर घातलेल्या आरोपीने मोबाईल नंबर देण्याचा बहाणा करून ट्रॅक्टरवर चढत जबरदस्तीने विवो मॉडेल २९ मोबाईल हिसकावला. दुसऱ्या आरोपीने फिर्यादीला पाठीमागून दाबत दोघांनी मिळून लाथाबुक्यांनी मारहाण केली व खिशातील १० हजार रुपये काढून घेतले. आरोपी त्यानंतर मोटारसायकलसह नाशिककडे पसार झाले. या प्रकरणी निफाड पोलिस ठाण्यात गु.र.नं. ३६९/२०२५ भा.दं.वि. ३०९(६), १२६(२) तसेच अपंग अधिनियम ९२ नुसार गुन्हा दाखल झाला होता.
तपासादरम्यान घटनास्थळ पंचनाम्यात टेक्नो स्पार्क कंपनीचा मोबाईल मिळाला. त्यातील जिओ सिम क्रमांकाच्या तपासातून मोबाईल आकाश ज्ञानेश्वर सानप, वय २२, रा. कसबे सुकेणे याचा असल्याची खात्री झाली. त्याला निफाड शिवारातून ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याने आपल्या साथीदार नवनाथ अरुण शिंदे, वय २०, रा.जळगाव फाटा याच्यासह गुन्हा केल्याची कबुली दिली. दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून फिर्यादीने त्यांची ओळख देखील पटवली आहे. आरोपी आकाश सानप याच्या अंगझडतीत फिर्यादीचा लुटलेला मोबाईल, त्यात जिओ व एअरटेल सिमकार्ड, गुन्ह्यात वापरलेली बजाज डिस्कव्हर मोटारसायकल एम एच १५, इ.पी.१२९० तसेच लाल रंगाचे फुल बाह्यांचे स्वेटर असा एकूण २० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. निफाड पोलिसांनी अल्पावधीत तपास करून आरोपींचा शोध घेत गुन्हा उघडकीस आणला. या कारवाईत पोलीस निरीक्षक गणेश गुरव, पो.उ.नि. राजेंद्र बावीस्कर, पो.उ.नि. विश्वनाथ निकम, पो.हवा अनिल शेरेकर, हवा.भास्कर पवार, हवा.किरण ढेकळे, हवा.शरद शिंदे, पो.ना. नितीन सांगळे, पो.शि.विनोद जाधव, राजु दरोडे, धनंजय जाधव व विक्रम लहाणे यांच्या पथकाने कामगिरी बजावली.

किरणकुमार आवारे

किरणकुमार आवारे हे गेली ३० वर्षांपासून प्रिंट मीडियात काम करत आहेत. याकाळात त्यांनी दैनिक देशदूत, दैनिक लोकमत, दैनिक गांवकरी, दैनिक उलाढाल, दैनिक तरुण भारत, दैनिक सार्वमत, दैनिक आधुनिक केसरी, दैनिक लक्ष महाराष्ट्र, लोकनामा मध्ये काम केले आहे व करत आहेत. दैनिक लोकनामा मध्ये त्यांनी सलग १५० भाग गावगाडा हे सदर चालवले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!