शेतकरी आक्रमक; मका आणि कांद्याला अनुदानासाठी तहसीलदारांना निवेदन
वेगवान मराठी :मारुती जगधने
दिनांक 23 फेब्रुवारी 2026
नांदगाव (प्रतिनिधी):
कांदा आणि मक्याच्या कोसळत्या भावामुळे हवालदिल झालेल्या नांदगाव तालुक्यातील शेतकरी आता आक्रमक झाले आहेत. मका आणि कांद्याला तातडीने अनुदान मिळावे आणि कांद्यावरील निर्यात शुल्क रद्द करावे, या मागणीसाठी आज समस्त शेतकरी बांधवांच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.नांदगाव शहरातील नांदगाव येवला रोडवरील बाजार समितीच्या प्रवेशद्वारा समोरील रस्त्यावर संतप्त शेतकऱ्यांनी काही वेळ कांदा व मका प्रश्नी रास्ता रोको केला .
- कांदा उत्पादक अडचणीत: सध्या बाजारपेठेत कांद्याला मिळणारा भाव अत्यंत कमी असल्याने उत्पादनाचा खर्चही निघणे कठीण झाले आहे. यामुळे शेतकरी कर्जबाजारी होत असून, शासनाने विक्री केलेल्या कांद्याला तातडीने अनुदान द्यावे आणि निर्यात शुल्क शून्य करावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
- मका पिकाची दैनावस्था: कांद्याप्रमाणेच मका पिकाची स्थितीही गंभीर आहे. हमीभावापेक्षा २०० रुपये कमी दराने मका विकला जात आहे. उत्पादन खर्च निघत नसल्याने मका उत्पादकांनाही त्वरित आर्थिक मदतीची गरज असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
- आंदोलनाचा इशारा: शासनाने या मागण्यांचा गांभीर्याने विचार करून त्वरित निर्णय न घेतल्यास, येणाऱ्या काळात अधिक तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला. या सर्व परिस्थितीला शासन सर्वस्वी जबाबदार राहील, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
या निवेदनावर निलेश देविदास चव्हाण, विशाल शिवाजीराव वडघुले, दत्तात्रय रमेश जाधव, प्रशांत सर्जेराव बोरसे यांच्यासह तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
विधिमंडळाच्या अधिवेशनात हा प्रश्न गाजता की काय शेतकऱ्यांच्या या प्रश्नावर केंद्र व राज्य सरकार काय भूमिका घेते, याकडे आता संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.



