बिबट्याला ठार करा या मागणीसाठी विद्यार्थी व ग्रामस्थांचा रास्ता रोको पिंजऱ्यात जेरबंद बिबट्यास घेऊन जाण्यास नागरिकांचा विरोध

वेगवान नाशिक / किरणकुमार आवारे
शिरवाडे वाकद दिनांक १२ नोव्हेंबर :- नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात दहशत माजवणारा नरभक्षक बिबट्या अखेर पहाटेच्या सुमारास देवगाव परिसरात वनविभागाच्या पिंजऱ्यात जेरबंद झाला. मात्र या बिबट्याला ठार मारावे, अन्यथा तो पुन्हा गावकऱ्यांच्या जीवाला धोका ठरू शकतो, या मागणीसाठी ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त करत रास्ता रोको आंदोलन छेडले आहे.
आंदोलकांनी वनविभाग व पोलिस दलाचा घेराव घालत पिंजरा अडवून ठेवला असून, “जोपर्यंत बिबट्या ठार मारत नाही, तोपर्यंत एकही विद्यार्थी शाळेत जाणार नाही,” असा इशारा विद्यार्थ्यांनी दिला आहे.
या ठिकाणी लासलगावचे स.पो.नि. भास्कर शिंदे फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले असून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
वनविभागाने बिबट्याला रेस्क्यू करून सुरक्षित स्थळी हलविण्याची तयारी केली असली तरी ग्रामस्थ ठाम भूमिकेत कायम आहेत. घटनास्थळी तणावाचे वातावरण असून पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे.



