लढा बळीराजाचा..१५सप्टेबरला नाशिक मध्ये शेतकऱ्यांचा शेतकरी आक्रोश मोर्चा ,माजी आमदार दिपिका चव्हाण यांचे शेतकऱ्यांना सहभागी होण्याचे आवाहन.

‘लढा बळीराजाचा’ शेतकरी आक्रोश मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी व्हा
दीपिका चव्हाण : शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली १५ सप्टेंबरला नाशिकमध्ये शेतकऱ्यांचा जंगी मोर्चा
—
वेगवान नाशिक/तुषार रौंदळ
सटाणा दि १३सप्टेबर२०२५ : -शेतकऱ्यांच्या विविध ज्वलंत प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षातर्फे येत्या सोमवारी (ता.१५) रोजी नाशिकमध्ये ‘लढा बळीराजाचा – शेतकरी आक्रोश मोर्चा’ काढण्यात येणार आहे. माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार स्वतः या मोर्चाचे नेतृत्व करणार असून राज्यभरातील हजारो शेतकरी या मोर्चात सहभागी होणार आहेत. कसमादे परिसरातील शेतकरी बांधवांनी या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन बागलाणच्या माजी आमदार सौ. दीपिका चव्हाण यांनी केले आहे.
यासंदर्भात बोलताना माजी आमदार सौ.चव्हाण म्हणाल्या, या मोर्चासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे, पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री जयंत पाटील, अनिल देशमुख, जितेंद्र आव्हाड यांच्यासह राज्यातील सर्व खासदार-आमदार, प्रदेश कार्यकारिणीचे पदाधिकारी, जिल्हास्तरीय नेते व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. कांदा दराचा प्रश्न, कापसावरील अन्यायकारक आयात धोरण, द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची व्यापाऱ्यांकडून होणारी लूट, शेतीमालाला हमीभाव व भावांतर योजना, कृषी निविष्ठांवरील जीएसटी, नैसर्गिक आपत्तीच्या वेळी तत्काळ पंचनामे व वाढीव मदत – या सर्वच प्रश्नांवर बळीराजाचा आवाज बुलंद करणे ही काळाची गरज आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न केवळ चर्चेत न राहता त्यावर त्वरित निर्णय व्हावेत यासाठी हा मोर्चा ऐतिहासिक ठरणार आहे. शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसह सातबारा कोरा झालाच पाहिजे. नवीन कर्ज वितरणात सीबीलची अट रद्द झालीच पाहिजे. कांद्याची मुक्त निर्यात सुरू करून प्रतिकिलो १० रुपये अनुदान मिळालेच पाहिजे. द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेज जाहीर झाले पाहिजे. भात, नागली, वरई यांसारख्या पिकांना योग्य बाजारभाव मिळावा. ओला व कोरडा दुष्काळ जाहीर करून भाजीपाला उत्पादकांसाठी तातडीचे पॅकेज जाहीर झालेच पाहिजे. बोगस खते-बियाण्यांवर कठोर कारवाई होऊन शेतकऱ्यांची लूट थांबली पाहिजे. शेतीमालाच्या उत्पादन खर्चावर दीडपट हमीभाव व १००% सरकारी खरेदी झाली पाहिजे. दुधाचे दर व अनुदानात वाढ व्हावी. कापसावरील आयात बंद करून प्रति क्विंटल ३००० रु. अनुदान द्यावे. द्राक्ष उत्पादकांसाठी विशेष पॅकेज व फसवणूक थांबविण्यासाठी कायदा करावा. ओला व कोरडा दुष्काळ जाहीर करून भाजीपाला उत्पादकांसाठी विशेष मदत द्यावी. बोगस खते-बियाण्यांवर कठोर कारवाई व लिंकिंग थांबवावी. या मोर्चाच्या प्रमुख मागण्या आहेत. शेतकर्यांच्या पिकाचा प्रश्न आजही अनुत्तरित आहे. शेतकरी आत्महत्येच्या उंबरठ्यावर उभा आहे आणि शासन मात्र केवळ आश्वासनांवर वेळ घालवत आहे. बळीराजाला खऱ्या अर्थाने दिलासा देण्यासाठी आपण सर्वांनी सोबत येणे गरजेचे आहे. नाशिकमधील ‘लढा बळीराजाचा’ हा मोर्चा हा केवळ आक्रोश नाही, तर शेतकऱ्यांच्या आयुष्याला नवी दिशा देणारा निर्धार आहे. कसमादे परिसरातील प्रत्येक शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहनही सौ.चव्हाण यांनी केले.
यावेळी माजी आमदार संजय चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे तालुकाध्यक्ष केशव मांडवडे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
प्रतिक्रिया :
बळीराजाच्या प्रश्नासाठी लढणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे. शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आम्ही आक्रमक पवित्रा घेत आहोत. नाशिकमधील हा मोर्चा केवळ निदर्शने नसून, शेतकऱ्यांच्या आयुष्याला दिशा देणारा ठरेल. कसमादे परिसरातील प्रत्येक शेतकरी, शेतमजूर व तरुणांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन बळीराजाचा आवाज बुलंद करावा.
– सौ. दीपिका चव्हाण, माजी आमदार



