नाशिक ग्रामीण

निफाड तालुक्यात आशा सेविकेचा लैंगिक छळ, आरोपीवर तात्काळ कारवाईची मागणी आशा, गट प्रवर्तक सेविकांच्या सुरक्षेसाठी ठोस धोरणाची मागणी

वेगवान नाशिक / किरणकुमार आवारे

शिरवाडे वाकद दिनांक २० ऑक्टोबर २०२५ : निफाड तालुक्यातील कानळद येथील आशा सेविकेवर झालेल्या लैंगिक छळप्रकरणी संताप व्यक्त होत आहे. दि. १८ ऑक्टोबर २०२५ रोजी झालेल्या या घटनेविरोधात महाराष्ट्र राज्य आशा गटप्रवर्तक कर्मचारी कृती समिती आणि आयटक यांच्या वतीने निफाड पोलिस ठाण्यात पोलिस निरीक्षक गणेश गुरव यांना निवेदन देण्यात आले.
पीडित आशा सेविका वय ३५ यांनी सकाळी गर्भवती महिलेस प्रसूतीसाठी देवगाव व नंतर नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयात नेल्यानंतर परतीच्या प्रवासात १०२ रुग्णवाहिका चालक भाऊसाहेब घुडगे, रा. निमगाव वाकडा याने शिवरे फाट्याजवळ रुग्णवाहिका थांबवून पीडित महिलेशी अश्लील वर्तन केल्याचा आरोप आहे. आरोपीने शरीरस्पर्श करून अश्लील प्रस्ताव मांडल्याचे फिर्यादीत नमूद आहे. पीडित महिलेने तात्काळ विरोध करत रुग्णवाहिकेतून उतरून नातेवाइकांशी संपर्क साधला. या प्रकारामुळे फिर्यादी महिलेला मानसिक त्रास झाला असून तिने तत्काळ पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली. निफाड पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा क्रमांक ३३६/२०२५ भा.दं.सं. (बीएनएस) कलम ७४, ७५(१)(ii) अंतर्गत दाखल केला आहे. मात्र या कारवाईने संघटना नाखुश असून आरोपीवर कलम ३५४, ५०९ आणि पॉश कायद्यानुसार गुन्हा नोंदवावा, पीडितेला शासनाकडून संरक्षण, वैद्यकीय मदत, समुपदेशन आणि आर्थिक भरपाई द्यावी, महिला आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही, जीपीएस व्यवस्था आणि महिला साथीदारासह प्रवासाची अनिवार्यता लागू करावी अशी निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे.
निफाड पंचायत समिती कार्यालयात झालेल्या सभेत सर्वांनी आशा कर्मचाऱ्यांच्या सन्मानाचा प्रश्न आता जनआंदोलनाचा विषय होईल असा निर्धार व्यक्त केला. ही केवळ एका स्त्रीवरील नव्हे, तर संपूर्ण आशा वर्गाच्या सन्मानावर झालेली लज्जास्पद घटना आहे. आरोपीवर तात्काळ कारवाई न झाल्यास राज्यव्यापी आंदोलन उभं राहील असा इशारा राज्याध्यक्ष राजू देसले यांनी दिला
या निवेदनावेळी कॉ.सुरेखा खैरनार (जिल्हा अध्यक्षा), प्राजक्ता कापडणे, तल्हा शेख, मनिषा खैरनार, रोहिणी मुदगल, रुपाली सानप, वैशाली कवडे, छाया जगताप, माधुरी बर्वे, वर्षा गांगुर्डे, प्रीती भाबड, सविता पवार, सोनाली उफाडे, कावेरी कदम, माई उगले आदींसह तालुक्यातील अनेक आशा गटप्रवर्तक मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

 

 

 

 

 

किरणकुमार आवारे

किरणकुमार आवारे हे गेली ३० वर्षांपासून प्रिंट मीडियात काम करत आहेत. याकाळात त्यांनी दैनिक देशदूत, दैनिक लोकमत, दैनिक गांवकरी, दैनिक उलाढाल, दैनिक तरुण भारत, दैनिक सार्वमत, दैनिक आधुनिक केसरी, दैनिक लक्ष महाराष्ट्र, लोकनामा मध्ये काम केले आहे व करत आहेत. दैनिक लोकनामा मध्ये त्यांनी सलग १५० भाग गावगाडा हे सदर चालवले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!