शेतकऱ्याने दागिने गहाण ठेऊन भांडवलासाठी घेतलेल्या कर्जाचे जुपिटर गाडीच्या डिकीतून दीड लाखांची चोरी; अज्ञात आरोपीवर गुन्हा दाखल

वेगवान नाशिक / किरणकुमार आवारे
शिरवाडे वाकद दि.१८ ऑक्टो २०२५ :- निफाड शहरातील उगाव रोड परिसरात एका शेतकऱ्याने दागिने गहाण ठेऊन शेती भांडवलासाठी घेतलेल्या कर्जाची जुपिटर गाडीच्या डिकीत ठेवलेली दीड लाख रुपयांची रोख रक्कम अज्ञात चोरट्याने लंपास केली. या प्रकरणी निफाड पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी निलेश विश्वनाथ निफाडे, वय ३८, व्यवसाय शेती, रा.सोनेवाडी बु. ता. निफाड यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दि.१७ ऑक्टो रोजी दुपारी १.३० वाजेच्या सुमारास ते उगाव रोडवरील गीताई कृषी सेवा केंद्रासमोर जुपिटर गाडी उभी करून औषधे खरेदी करण्यास गेले होते. त्यांनी गाडीच्या डिकीत १०० रु किमतीच्या २०० नोटा, २०० रु.च्या १०० नोटा, ५०० रु.च्या २१४ असे रोख १,४७,००० रु रोख रक्कम, कापडी पिशवी, पासबुक आणि दागिने गहाण ठेवल्याची पावतीही डिकीत ठेवलेली होती. दरम्यान, काही वेळानंतर अज्ञात चोरट्याने गाडीच्या डिकीतून रोख रक्कम आणि पिशवी चोरून नेली. या घटनेनंतर निफाड पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध भा.न्या.सं.कलम ३०३(२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पो.नि.गणेश गुरव यांचे मार्गदर्शनाखाली पो.ना.सांगळे अधिक तपास करीत आहेत.



