कुंदेवाडी रेल्वे गेटजवळ भीषण अपघात; तीन वर्षीय अंशचा जागीच मृत्यू

वेगवान नाशिक / किरणकुमार आवारे
शिरवाडे वाकद दि.१८ ऑक्टो २०२५ :– कुंदेवाडी रेल्वेगेट जवळ घडलेल्या भीषण अपघातात तीन वर्षीय बालकाचा जागीच मृत्यू झाला असून त्याची आजी गंभीर जखमी झाली आहे. ही घटना शनिवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास घडली.
भिमराव साहेबराव निरभवणे (वय ३८, रा. करंजगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दि. १८ ऑक्टोबर रोजी ते आपल्या आई लक्ष्मीबाई आणि पुतण्या अंश अर्जुन निरभवणे (वय ३) यांना घेऊन बजाज प्लॅटीना मोटारसायकलने कुंदेवाडी येथे जात होते. सव्वा अकराच्या सुमारास रेल्वेगेट सुटल्यानंतर वाहतुकीची गर्दी झाल्याने त्यांनी मोटारसायकल रस्त्याच्या डाव्या बाजूस थांबवली. यावेळी पिंपळगाव बसवंतकडून वेगात आलेल्या मालट्रक (क्र. सी.जी.०६ जी.क्यु.६६९५) ने त्यांच्या मोटारसायकलला कट मारला. या अपघातात मोटारसायकलवरील अंश आणि लक्ष्मीबाई हे रस्त्याच्या उजव्या बाजूला पडून ट्रकच्या चाकाखाली आले. ट्रकच्या चाकाखाली अंशचे डोके व पाय चिरडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला, तर लक्ष्मीबाई यांच्या पायावरून चाक गेल्याने त्या गंभीर जखमी झाल्या. भिमराव यांच्या पायालाही दुखापत झाली आहे.
अपघातानंतर नागरिकांच्या मदतीने जखमींना निफाड उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे डॉक्टरांनी अंशला मृत घोषित केले, तर लक्ष्मीबाई यांना पुढील उपचारासाठी नाशिक येथे हलविण्यात आले.
या प्रकरणी ट्रकचालक मोहम्मद महबुबार रहमत (वय ४४, रा. छोदोझा धुलीया, प. बंगाल) याच्याविरुद्ध निफाड पोलिस ठाण्यात भा. दं. सं. २०२३ चे कलम १०६(१), २८१, १२५(अ)(ब), ३२४(४), १८४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक गणेश गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पो.कॉ. मनीषा गायकवाड करीत आहेत.



