नाशिक ग्रामीण

क्षेत्र अडबंगीनाथ जन्मभूमी – तपोभूमी व दीक्षाभुमी धामोरी येथे धर्मबीज सोहळ्याचे आयोजन ; पन्नास हजार भाविक उपस्थित राहतील असा अंदाज..

वेगवान नाशिक / किरणकुमार आवारे

शिरवाडे वाकद:- अहिल्यादेवी नगर व नाशिक जिल्ह्याच्या सरहद्दीवर असलेल्या धामोरी येथे सालाबादप्रमाणे श्री क्षेत्र अडबंगीनाथ जन्मभूमी – तपोभूमी व दीक्षा भुमी, श्री नवनाथ मंदिर धामोरी येथे सोमवार दि.१२ जानेवारी २०२६ ते स़ोमवार १९ जानेवारी २०२६ पर्यंत नवनाथ पारायण सोहळा व मंगळवार दि.२० जानेवारी २०२६ रोजी धर्मनाथ बीज सोहळा संत मंहत व भाविक भक्तांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.

धामोरी येथील अडबंगीनाथ तपोभुमी ही नवनाथ संप्रदायाचे आदिपीठ असुन अडबंगीनाथाचे जन्मस्थान व तपोभुमी आहे. नवनाथ ग्रंथामध्ये अध्याय ३४ वा यामध्ये ओवी क्र.६२ मध्ये दर्शविल्याप्रमाणे श्री गोरक्षनाथांनी अडबंगीनाथाना दिक्षा देऊन आपल्या पदस्पर्शाने हे स्थान पुनीत केले आहे. येथे अडबंगीनाथानी बारा वर्षे तप केले आहे. या जागेवर नवनाथांचे भव्य मंदीर व नऊ विराट फांद्यांचा वृक्ष हा गोरक्षचिंच म्हणुन प्रख्यात आहे. या वृक्षास येणारे फळ हे नारळासारखे आकाराचे असते. अत्यंत प्राचिन आर्यूवेद शास्राआधारे सदरच्या गोरक्षचिंचेची पाने, फळे व साल हे बहुरोग नाशक म्हणुन प्रसिध्द असुन भाविकांना त्याचा लाभ मिळतो. हा प्राचीन वृक्ष बघण्यासाठी अनेक भक्त येत असतात. दरवर्षी येथे धर्मनाथबीज सोहळा हजारो भाविकांच्या उपस्थीतीत संपन्न होत आहे.

सोमवार दि.१२ जानेवारी २०२६ ते सोमवार दि.२० जानेवारी २०२६ दररोज सकाळी श्री नवनाथ ग्रंथाचे पारायण होईल. रविवार दि.१८ जानेवारी २०२६ रोजी दुपारी ४ ते ५ या वेळेत ॲड राजेंद्र बदामे यांच्या शुभहस्ते शनिदेव अभिषेक, सायं ६ ते ७ मधुकर महाराज गडाख यांचे प्रवचन, सोमवार दि.१९ जानेवारी २०२६ दुपारी ४ ते ६ प.पु. संतश्री दत्तानंदगिरी महाराज (टाकेद, घोटी) यांचे प्रवचन होईल. मंगळवार दि.२० जानेवारी २०२६ रोजी सकाळी ७.३० वा. श्री नवनाथ ग्रंथपूजन प.पु. संतश्री चंद्रशेखरनाथ महाराज यांच्या हस्ते होईल. सकाळी ८ ते ९ भिक्षाफेरी व श्री नवनाथ पालखी मिरवणूक, कलश पुजन, सकाळी १० वा. ह.भ.प. शिवाजी महाराज भालुरकर यांचे धर्मनाथ बीजेनिमित्त किर्तन होईल. सकाळी ११.४३ वा. प.पु. गुरुवर्य संतश्री रमेशगिरीजी महाराज हे अमृतसंदेश देतील. त्यानंतर पुरातन काळापासून चालत आलेल्या आमटी भाकरेचा महाप्रसाद होईल.

यावेळी कलश पुजन माजी खासदार सुजय विखे, खा.भाऊसाहेब वाकचौरे, आ.आशुतोषदादा काळे, मा.विवेक कोल्हे, कैलास कोते, कैलास भोसले, नगराध्यक्ष पराग संधान, दिपक विसपुते, दत्तात्रय पाटील यांच्या शुभहस्ते होईल.

या धर्मनाथ बीज सोहळ्यासाठी भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन विजय जाधव, विश्वास जाधव, सौ विमल बोरसे, बाबासाहेब मांजरे, राहुल जाधव, अभिजीत जाधव, बाळकृष्ण मांजरे, सौ.विद्याताई पाटील, सौ.विलासी कदम, सौ.ऐश्वर्या दिघे, चेतन कदम, सौ.विजयमाला खैरनार, सौ.राधिका पाटील, गोरक्ष बोरसे, सौ.विश्वावती काळे, सौ.रागिणी देशमुख, अडबंगीनाथ सेवा भक्त मंडळ, गोरक्षनाथ सेवा मंडळ, श्री स्वामी समर्थ सेवेकरी, श्री साई आनंदवल्ली मित्र मंडळ, जाणता राजा मंडळ, ए वन मंडळ, न्यु इंग्लिश स्कूल, के.बी.रोहमारे महाविद्यालय, सर्व ग्रामस्थ व समस्थ भजनी मंडळ यांनी केले आहे.

 

गोरक्षनाथ मंदिर, धामोरी (धामापूर)

अडबंगीनाथांची जन्मभूमी व तपोभूमी
कोपरगाव तालुक्यातील धामोरी (धामापूर) येथील गोरक्षनाथ मंदिर परिसर नाथ संप्रदायासाठी अत्यंत पवित्र मानला जातो. हे स्थान अडबंगीनाथ (माणिकनाथ) यांची जन्मभूमी व तपोभूमी म्हणून ओळखले जाते. याच ठिकाणी अडबंगीनाथांनी तब्बल बारा वर्षे कठोर तपश्चर्या केली. त्यांच्या तपस्येने प्रसन्न होऊन गोरक्षनाथांनी त्यांना नाथ संप्रदायाची दीक्षा दिली आणि पुढील धार्मिक कार्यासाठी आपल्यासोबत नेले, अशी परंपरागत आख्यायिका आहे.
या परिसरातील विशेष आकर्षण म्हणजे गोरक्षनाथ मंदिरासमोर उभा असलेला अतिप्राचीन व विशाल गोरक्ष चिंचेचा वृक्ष. या चिंचेला नऊ मोठ्या फांद्या असल्यामुळे तिला ‘नवनाथांची चिंच’ असेही संबोधले जाते. आयुर्वेदानुसार हे झाड बहुरोगनाशक मानले जाते.
स्थानिक आख्यायिकेनुसार, माणिक नावाचा शेतकरी शेतात काम करत असताना गोरक्षनाथ तेथे आले. त्यांनी माणिककडे भोजनाची मागणी केली. माणिकने कोणताही विचार न करता आपली शिदोरी व पाणी त्यांना अर्पण केले. या सेवाभावामुळे गोरक्षनाथ प्रसन्न झाले व माणिकला वर मागण्यास सांगितले. मात्र माणिकने वर न मागता उलट गोरक्षनाथांनाच वर देण्याची तयारी दर्शवली. गोरक्षनाथांनी त्याच्याकडून एकच वचन घेतले—मनात येईल ते करू नकोस.
सायंकाळी गोरक्षनाथ निघून गेल्यानंतर माणिक नांगर डोक्यावर घेऊन उभा राहिला. घरी जाण्याची इच्छा मनात येताच दिलेल्या वचनाची आठवण झाली आणि तो त्याच अवस्थेत स्थिर उभा राहिला. असे म्हणतात की तो बारा वर्षे एकाच जागी तपश्चर्या करत राहिला आणि पूर्णतः क्षीण झाला.
काही काळानंतर गोरक्षनाथ गुरू मच्छिंद्रनाथ व चौरंगीनाथांसह तेथे आले. मच्छिंद्रनाथांनी माणिकच्या तपस्येचे कौतुक केले. त्यानंतर गोरक्षनाथांनी माणिकच्या कानात मंत्रोपदेश केला आणि तो ज्ञानप्राप्त झाला. त्याला ‘अडबंगीनाथ’ असे नाव देण्यात आले आणि गोरक्ष चिंचेखाली नाथ संप्रदायाची दीक्षा देण्यात आली.
आज या ठिकाणी गोरक्षनाथांचे मंदिर, अडबंगीनाथांचे मंदिर तसेच दीक्षास्थान असलेले महाकाय चिंचेचे झाड पाहायला मिळते. उंच जोत्यावर उभारलेल्या गोरक्षनाथ मंदिरात सभामंडप व गर्भगृह आहे. सभामंडपात नाथांची पालखी ठेवलेली असून उत्सवकाळात नवनाथांची पालखी मिरवणूक काढली जाते. गर्भगृहात नऊ नाथांच्या मूर्ती विराजमान आहेत. मंदिराभोवती प्रदक्षिणा मार्ग असून या मंदिरात महिलांना प्रवेश दिला जात नाही.
मंदिरासमोरील गोरक्ष चिंचेखाली अडबंगीनाथांचे मंदिर आहे. या चिंचेचे खोड इतके विशाल आहे की त्यामध्ये चार व्यक्ती सहज बसू शकतील. खोडामधून पूर्व-पश्चिम दिशेला जाणारा भुयारी मार्ग असल्याची आख्यायिकाही सांगितली जाते. पूर्वी लग्न किंवा धार्मिक कार्यांसाठी या भुयारातून भांडी मिळत असत आणि वापरानंतर ती परत ठेवल्यावर आपोआप आत जात, असे स्थानिक सांगतात.
या चिंचेच्या नऊ फांद्यांपैकी आठ फांद्यांची पाने गळून गेल्यानंतरच नवव्या फांदीची पाने गळतात, अशी श्रद्धा आहे. झाडाची पाने, फळे व साल औषधी गुणधर्मयुक्त मानली जातात. विशेष म्हणजे या झाडाच्या बियांपासून नवीन रोपे तयार होत नाहीत, हे येथे एक अद्भुत वैशिष्ट्य मानले जाते.
श्रीमच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ आणि चौरंगीनाथ यांच्या पदस्पर्शाने पावन झालेले हे स्थान नाथ संप्रदायात अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. दरवर्षी माघ शुद्ध द्वितीया या दिवशी येथे धर्मबीज उत्सव साजरा केला जातो. या दिवशी हजारो भाविक व नाथपंथीय मोठ्या श्रद्धेने उपस्थित राहतात.

किरणकुमार आवारे

किरणकुमार आवारे हे गेली ३० वर्षांपासून प्रिंट मीडियात काम करत आहेत. याकाळात त्यांनी दैनिक देशदूत, दैनिक लोकमत, दैनिक गांवकरी, दैनिक उलाढाल, दैनिक तरुण भारत, दैनिक सार्वमत, दैनिक आधुनिक केसरी, दैनिक लक्ष महाराष्ट्र, लोकनामा मध्ये काम केले आहे व करत आहेत. दैनिक लोकनामा मध्ये त्यांनी सलग १५० भाग गावगाडा हे सदर चालवले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!