बारामतीत भऊरच्या लिखिता पवारची ऐतिहासिक कामगिरी!
शालेय कराटे स्पर्धेत पटकावले रौप्य पदक!

वेगवान नाशिक / बाबा पवार
देवळा : बारामती (पुणे) येथे नुकत्याच संपन्न झालेल्या राज्यस्तरीय शालेय कराटे गव्हर्नमेंट स्पर्धेत भऊर ता.देवळा (जि. नाशिक) गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. येथील कु. लिखिता जगदिश पवार या विद्यार्थिनीने १९ वर्षांखालील (U-19) गटात संपूर्ण महाराष्ट्रात दुसरा क्रमांक मिळवत रौप्य पदकाची (Silver Medal) ऐतिहासिक कमाई केली आहे. तिच्या या नेत्रदीपक कामगिरीमुळे तिने केवळ भऊर गावाचेच नव्हे, तर संपूर्ण विभागाचे नाव राज्यभर उंचविले आहे.
राज्यभरातील शेकडो गुणवंत खेळाडूंनी सहभाग घेतलेल्या या अत्यंत चुरशीच्या स्पर्धेत, लिखिताने आपल्या उत्कृष्ट आणि शिस्तबद्ध खेळाचे प्रदर्शन केले. तिने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही शांत राहून प्रतिस्पर्धकांना आव्हान दिले आणि अंतिम सामन्यापर्यंत मजल मारली. तिच्या कठोर परिश्रमाला आणि आत्मविश्वासाला रौप्य पदकाच्या रूपात मोठे यश मिळाले आहे.




