
कोल्या नाल्यातून आलेल्या पुरामुळे हनुमान नगरमध्ये मोठे नुकसान
वेगवान मराठी : मारुती जगधने
[ दि – 28 सप्टेंबर 2025 ]
दिनांक 27 सप्टेंबरच्या मध्यरात्रीनंतर झालेल्या मुसळधार पावसामुळे सकाळी 28 सप्टेंबर रोजी कोल्या नाल्याला मोठ्या प्रमाणात पूर आला. नाल्यातून आलेल्या पाण्याने हनुमान नगर परिसरातील शेकडो घरांना वेढा घातला. या अनपेक्षित पुरामुळे नागरिकांच्या जीवितास मोठा धोका निर्माण झाला होता.
नागरिकांचे जीव वाचले – संसार उद्ध्वस्त
हनुमान नगरच्या कॉर्नरवर राहणारे पंकज तायडे व पत्नी हेमलता तायडे यांच्या घरात अचानक पाणी घुसले. शेजारील नागरिकांनी तत्परतेने मदत करून दोघांनाही बाहेर काढले. त्यामुळे त्यांचे प्राण वाचले, परंतु घरातील संपूर्ण संसारोपयोगी भांडीवस्तू पुराच्या पाण्यात वाहून गेल्या.
त्याचप्रमाणे परिसरातील भारती बागोरे यांचे कटलरी व कपड्यांचे दुकान पाण्यात बुडाले. दुकानातील साड्या व अन्य साहित्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले.
याच ठिकाणी राहणारे किसन चकोर यांच्या घरातदेखील पाणी घुसले. त्यांनी कसाबसा जीव वाचवला; मात्र घरातील सर्व वस्तू पुराबरोबर वाहून गेल्या.
तसेच अर्जुन औशीकर व भरत औशीकर यांच्या कुटुंबांनाही नाल्याच्या पुराचा फटका बसला. त्यांच्या घरातील सर्व संसारपयोगी वस्तू नष्ट झाल्या असून ते कसाबसा घराबाहेर पडून वाचले.
रस्ते व शाळेच्या शिंतीला पाणी
नाल्यातील पाणी मावेनासे झाल्यामुळे मोठा पुरवठा व एक मोठे झाड पुलावर येऊन अडकल्याने नाल्याचे पाणी थेट रस्त्यावरून वाहू लागले. त्यामुळे इंग्लिश स्कूलच्या आवारापर्यंत पाणी पोहोचले. इतकेच नव्हे तर नॅशनल हायवेवरही पुराचे स्वरूप आले. रस्त्यावरून वाहणारे हे पाणी आसपासच्या घरे व दुकानांत घुसून नुकसान करून गेले.
पंचनामे सुरू – नागरिक दहशतीत
हनुमान नगरमधील शेकडो घरे या पुराच्या पाण्याखाली गेली. नागरिक अक्षरशः दहशतीखाली आले होते. दरम्यान, तलाठी, सर्कल अधिकारी व महसूल यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली असून पंचनाम्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
एकंदरीत, कोल्या नाल्यावरील पुरामुळे हनुमान नगर परिसरात जीवितहानी टळली असली तरी मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे. नागरिकांना प्रशासनाकडून तातडीने मदत मिळावी, अशी मागणी होत आहे.दरम्यान या नाल्याला आलेले पुराने शेजारी असलेले कलावती मातेसंबंधी पूर्णपणे पाण्याखाली गेलं होतं आणि या पाठीमागील घरांना देखील या पूर पाण्यामध्ये फटका बसला .



