वाहतूक पोलिसास धक्काबुक्की, शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी

वेगवान नाशिक / किरणकुमार आवारे
शिरवाडे वाकद दि.२० सप्टें २०२५ :- पिंपळगाव बसवंत परिसरात वाहतूक नियंत्रण करत असलेल्या पोलिसाला धक्काबुक्की, शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पिंपळगाव बसवंत पोलिस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी पो.अं. सागर रामदास राऊत, वय ३२, नेमणूक पिंपळगाव ब.पोलिस ठाणे, यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ते दि.१९ सप्टें रोजी सायं. ५ वाजता चिंचखेड चौफुली येथे वाहतूक नियंत्रणाचे कर्तव्य बजावत होते. यावेळी आरोपी तेजस भास्कर पवार, वय २४, रा.सोहम पार्क, पिंपळगाव ब. याने आपल्या ट्रक क्र. एम.एच १५ सी.के ९५१३ चा किरकोळ अपघात केला. त्यावेळी फिर्यादी राऊत यांनी त्याला गाडी हळू चालविण्याचे समजावल्यावर, आरोपीने संतापून त्यांना शिवीगाळ करून अंगावर धाव घेत गणवेशाची गच्ची पकडत धक्काबुक्की केली.
दरम्यान, घटनास्थळी आलेल्या भास्कर विश्वनाथ पवार, वय-५२ याने फिर्यादीस ‘ ‘नाईट ड्युटीला असताना शोधून गाडी घालून ठार मारेन’ अशी धमकी देत शिवीगाळ केली. या कृत्यामुळे शासकीय कामात अडथळा निर्माण होऊन पोलिसाच्या सुरक्षिततेला धोका निर्माण झाला.
या प्रकरणी आरोपींविरुद्ध भा.दं.वि. कलम १३२, ३५१(३), ३५२, ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस निरीक्षक देशमुख यांनी घटनास्थळाची पाहणी केली आहे. पुढील तपास ए.एस.आय आहेर करीत आहेत.



