
नांदगाव तालुक्यात सेवा पंधरवडा साजरा होणार
नांदगाव, : – नांदगाव तालुक्यामध्ये येत्या दिवसांत “सेवा पंधरवडा” साजरा करण्यात येणार असून शासनाच्या विविध योजनांचा लाभ नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचावा यासाठी विशेष उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. अशी माहिती तहसीलदार सुनील सैंदणे यांनी दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिवसानिमित्त (17 सप्टेंबर) व राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त (2 ऑक्टोबर) या कालावधीत हा सेवा पंधरवडा राबविण्यात येणार आहे.
या उपक्रमांतर्गत तालुक्यातील शाळांमधून विविध कार्यक्रमांचे आयोजन करून विद्यार्थी व नागरिकांमध्ये जनजागृती केली जाणार आहे. तसेच ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांना शासनाच्या विविध योजना समजावून सांगून त्यांचा लाभ घेण्यासाठी प्रोत्साहित केले जाईल.
तहसीलदार कार्यालयासह तालुक्यातील इतर सर्व शासकीय कार्यालयांतून या कालावधीत तक्रार निवारण, योजना नोंदणी, लाभधारकांचे अर्ज स्वीकृतीकरण, तसेच विविध प्रमाणपत्रे यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. यामध्ये आयुष्मान भारत कार्ड, शेतकरी सन्मान योजना, गृहनिर्माण योजना, विधवा व निराधारांना अनुदान, शैक्षणिक शिष्यवृत्ती आदींचा समावेश आहे.
नागरिकांनी या सेवापंधरवड्यात मोठ्या संख्येने सहभागी होऊन शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन तहसीलदार सुनील सैंदाणे यांनी केले आहे.



