जाहिरातींवरून वांदग.. राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रशासनाविरोधात आक्रमक पवित्रा, सामान्य जनतेला कर.. राजकीय नेत्यांना सुट.. शहरवासीयांचा सवाल

माजी नगराध्यक्ष सुनील मोरे यांच्या जाहिरातींवरून राष्ट्रवादीचा संताप
वेगवान नाशिक /तुषार रौंदळ
सटाणा दि.२९ऑगस्ट२०२५
आगामी काळात होऊ घातलेल्या सटाणा नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या तोंडावर शहरात राजकीय हालचाली वेग घेत असुन ,सटाणा शहरात माजी नगराध्यक्ष सुनील मोरे यांनी कोणतीही परवानगी न घेता खाजगी, सहकारी तसेच शासकीय भिंतींवर जाहिराती व वॉल पेंटिंग केल्याने मोठा वादंग निर्माण झाला आहे. सामान्य जनतेकडून जाहिरातीसाठी कर आकारला जातो, नगरपालिका परवानगी शिवाय एकही बॅनर किंवा पोस्टर लावता येत नाही. मग नेत्यांना मात्र असा विशेषाधिकार का दिला जातो ? असा संतप्त सवाल राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) ने उपस्थित करत प्रशासनाविरोधात आक्रमक झाला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार संजय चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली तालुकाध्यक्ष केशव मांडवडे,शहराध्यक्ष भरत काटके, माजी नगरसेवक मनोज सोनवणे, सुमित वाघे, विलास सोनवणे, राजेंद्र डोंगरे,
चेतन वणीस, अल्ताफ मुल्ला, रामा पवार, मुन्ना कासिम यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी ज्योती भगत यांना घेराव घालत तीव्र निषेध व्यक्त करत निवेदन दिले. या निवेदनात मोरे यांच्यावर तातडीने गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात
आली.
निवेदनानंतर मुख्याधिकारी भगत यांनी तात्काळ हालचाल करत शहरातील परवानगी शिवाय लावलेले बॅनर, पोस्टर व वॉल पेंटिंग काढून टाकण्याचे आदेश दिले संबंधित विभागाला दिले असुन कारवाई सुरू करण्यात आली आहे.परवानणगिशिवाय कुठलीही जाहिरात चालणार नाही.असा स्पष्ट इशारा प्रशासनाने दिला.या प्रकरणामुळे अनेक गंभीर प्रश्न उभे केले आहेत. सामान्य नागरिकांना जाहिरात कर भरूनच ठरवून दिलेल्या दिवसांपर्यंत जाहिरात लावण्याची परवानगी मिळते. जास्त दिवस जाहिरात ठेवायची असल्यास अतिरिक्त कर भरावा लागतो. पण माजी नगराध्यक्ष मोरे यांनी ना कर भरला, ना परवानगी घेतली. नगरपालिका प्रशासनाने याकडे आधी दुर्लक्ष केले का? हा देखील संशय आता अधिक गडद होत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आंदोलनानंतर हि कारवाई करण्यात आली आहे.जर हे आंदोलन झालेच नसते तर मोरे यांची जाहिरात बिनदिक्कतपणे सुरुच राहिली असती का ? नगरपालिकेच्या लक्षात ही गोष्ट आली नसती का ?कि सगळं माहिती असुनही जाणुनबुजून डोळेझाक करत होते .असा आरोप विरोधकांनी केला आहे
यामुळे शहरवासीयांमध्ये रोष उसळला असून, आमच्याकडून कर वसुल करून नियम लावले जातात, मग राजकीय नेत्यांना सूट का? असा थेट सवाल आता नागरिक विचारत आहेत.
या प्रकारातून सटाणा शहरात प्रशासनाने नेत्यांसाठी वेगळे, जनतेसाठी वेगळे असे दुहेरी निकष ठेवल्याचे स्पष्ट झाल्याचे चित्र समोर आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आक्षेपानंतर या विषयाला आता राजकीय वादंगाचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
यापुढे नगरपालिका प्रशासन नेत्यांविरुद्ध ठोस भूमिका घेते का? की पुन्हा त्यांच्यावर मूकसंमती राहते, याकडे सटाणा शहरवासीयांचे बारकाईने लक्ष लागले आहे.



