राज्याचे कृषी आयुक्त सूरज मांढरे यांची कुंदेवाडी येथील कृषी संशोधन केंद्रास भेट

वेगवान नाशिक / किरणकुमार आवारे
शिरवाडे वाकद:- निफाड येथील कृषी संशोधन केंद्र शेतकऱ्यांसाठी उपयुक्त असून महाराष्ट्रातील उत्कृष्ट संशोधन केंद्रांपैकी एक
असल्याचे प्रतिपादन राज्याचे कृषी आयुक्त सूरज मांढरे यांनी केले.
म.फु.कृ.वि.राहुरीचे कुलगुरू डॉ.विलास खर्चे व संशोधन संचालक डॉ. प्रशांत बोडके यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमानिमित्त मांढरे यांनी कुंदेवाडी येथील कृषी संशोधन केंद्रास भेट देऊन संशोधन केंद्रातील विविध उपक्रमांची पाहणी केली. भेटीदरम्यान केंद्राने विकसित केलेल्या गव्हाच्या विविध सुधारित वाणांची सविस्तर माहिती घेतली.
अधिक उत्पादन देणारा, कमी कालावधीत येणारा, तांबेरा रोगास प्रतिकारक तसेच बुटका व न लोळणारा ‘फुले समाधान’ या लोकप्रिय वाणाबाबत त्यांनी विशेष रस दाखवला. या वाणाचे क्षेत्र वाढत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. कमी पाण्यात येणारे, उशिरा पेरणीसाठी उपयुक्त व उच्च पोषणयुक्त (बायो-फोर्टिफाइड) वाणांबाबतही माहिती घेतली. बिस्किट उद्योगासाठी उपयुक्त ‘फुले सात्विक’ या वाणाच्या व्यावसायिकीकरणासाठी प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. गहू पिकावरील तांबेरा रोगाविषयी माहिती घेत संशोधनाची दिशा व बीज उत्पादन कार्यक्रमाबाबत सविस्तर चर्चा झाली. यावेळी राष्ट्रीय पातळीवरील शास्त्रज्ञांच्या उपस्थितीत केंद्रात सुरू असलेल्या संशोधन व बीजोत्पादन कार्याची पाहणी केली. संशोधन, व्यवस्थापन व परिसर पाहून कृषी आयुक्तांनी समाधान व्यक्त केले. यावेळी डॉ.प्रमोद रसाळ (माजी संचालक शिक्षण व गहू विशेषज्ञ), संशोधन केंद्राचे प्रमुख प्रा.भालचंद्र म्हस्के, डॉ.निलेश मगर, प्रा.संजय चितोडकर, डॉ.भरत मालुंजकर, राजेश लोखंडे, बाळू झडे कृषी विभागाच्या वतीने विभागीय कृषी सहसंचालक सुभाष काटकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविंद्र माने, प्रकल्प संचालक (आत्मा) अभिमन्यू काशिद, उपविभागीय कृषी अधिकारी भटू पाटील, तालुका कृषी अधिकारी सुधाकर पवार आदी अधिकारी उपस्थित होते.



