नाशिक ग्रामीण
पोस्ट ऑफिस बंद: ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांना कोंडले

वेगवान नाशिक / बाबा पवार
देवळा : गेल्या सहा दशकांपासून ग्रामस्थांच्या सेवेत असलेले देवळा तालुक्यातील खामखेडा पोस्ट ऑफिस कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय अचानक बंद करण्यात आल्याने नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. या निर्णयाचा निषेध म्हणून, पोस्ट ऑफिसच्या अंतिम तपासणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना संतप्त ग्रामस्थांनी आणि पदाधिकाऱ्यांनी थेट ग्रामपंचायत कार्यालयातच कोंडून ठेवले.
हा अचानक घेतलेला निर्णय ग्रामस्थांसाठी एक मोठा धक्का आहे, कारण यामुळे ‘लाडकी बहीण योजना’, ‘वृद्धापकाळ निवृत्तीवेतन’, ‘सुकन्या समृद्धी योजना’, ‘ग्रामीण टपाल जीवन विमा’, ‘पोस्ट सेव्हिंग स्कीम’ अशा अनेक महत्त्वाच्या सरकारी योजना आणि आर्थिक व्यवहार ठप्प झाले आहेत. या सर्व कामांसाठी आता गावकऱ्यांना ५ ते ६ किलोमीटर दूरच्या गावात जावे लागणार आहे, ज्यामुळे त्यांची मोठी गैरसोय होणार आहे.
पोस्ट ऑफिस बंद झाल्याच्या निषेधार्थ, ग्रामपंचायत पदाधिकारी आणि संतप्त ग्रामस्थांनी तपासणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना ग्रामपंचायत कार्यालयातच कोंडून ठेवले. ग्रामपंचायतीच्या दरवाजाला कुलूप लावून त्यांनी आपला निषेध नोंदवला. परिस्थिती तणावपूर्ण बनल्यानंतर, अधिकाऱ्यांनी वरिष्ठांशी चर्चा करून या समस्येवर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले, त्यानंतरच वातावरण शांत झाले.
गावाचे सरपंच वैभव पवार यांनी या निर्णयावर नाराजी व्यक्त करत म्हटले, “पोस्ट ऑफिस बंद झाल्यामुळे गावातील वृद्ध, महिला आणि विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय झाली आहे. आर्थिक किंवा इतर व्यवहारांसाठी इतक्या दूर जाणे अन्यायकारक आहे. आम्ही त्वरित पोस्ट ऑफिस सुरू करण्याची मागणी करत आहोत, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल.”
यावेळी माजी उपसरपंच श्रावण बोरसे, सदस्य गणेश शेवाळे, अनूप शेवाळे, निलेश शिरोरे, महेंद्र पवार, अलकाबाई पानपाटील, छाया राजभोज, लताबाई पवार, मंगलबाई भालेराव यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. ग्रामस्थांनी तातडीने पोस्ट ऑफिस पुन्हा सुरू करण्याची मागणी केली असून, यावर योग्य तोडगा न निघाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
Tags
Post office


