शेतकरी कर्जमुक्तीसाठी राज्यव्यापी आंदोलन ३ व ४ सप्टेंबर रोजी ओझर येथे महासभा
शेतकरी कर्जमुक्तीसाठी राज्यव्यापी आंदोलन ३ व ४ सप्टेंबर रोजी ओझर येथे महासभा

वेगवान मराठी/ एकनाथ भालेराव
नाशिक / दिनांक :30 ऑगस्ट: शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमुक्तीसाठी राज्यभर सर्वपक्षीय आणि सर्व शेतकरी संघटनांच्या उपस्थितीत व्यापक जनआंदोलन उभारण्यात येणार आहे. हे आंदोलन दि. ३ आणि ४ सप्टेंबर रोजी शेतकरी नेते स्व. शरद जोशी यांच्या जयंतीनिमित्त नाशिक जिल्ह्यातील जनशांती धाम, शांतिगिरी महाराज आश्रम, दहावा मैल, ओझर येथे होणार असल्याची माहिती शेतकरी समन्वय समितीचे राज्याध्यक्ष भगवान बोराडे यांनी दिली.
मांगीतुंगी येथे बैठकीला कैलास बोरसे, दिलीप पाटील यांच्यासह विविध शेतकरी संघटनांचे नेते, शेतकरी तसेच नाशिक जिल्हा बँकेचे थकबाकीदार सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या बैठकीत जिल्हा बँकेच्या २०२५-२६ च्या सामोपचार योजनेस तीव्र विरोध दर्शविण्यात आला. २०२० पासून राबविलेल्या चार सामोपचार योजनांना केवळ २५ ते २८ टक्के प्रतिसाद मिळाला असल्याचे स्पष्ट करण्यात आले. शेतकरी कर्ज फेडण्यास तयार नसून व्याजमाफीसह केवळ मुद्दलाचे हप्ते घेण्याची मागणी सातत्याने केली जात आहे.
अलीकडील निर्णयानुसार थकबाकीवर दोन ते सहा टक्के व्याज आकारण्याचे ठरविण्यात आले आहे. या निर्णयाला उपस्थित शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केला.
शेतकरी संघटनांचे म्हणणे आहे की, सत्ताधारी व विरोधी पक्षांनी विधानसभा निवडणुकीत पूर्ण कर्जमुक्तीचे आश्वासन दिले होते. मात्र वारंवार सामोपचार योजना राबवून शेतकऱ्यांची दिशाभूल केली जात आहे. शासन व बँकेच्या भूमिकेचा निषेध नोंदवत शेतकऱ्यांनी संपूर्ण कर्जमुक्तीची मागणी अधोरेखित केली.



