फटाक्यांची दुकानं सजली पण मागणी घटली; ‘ग्रीन फटाक्यां’ना मात्र पसंती
फटाक्यांची दुकानं सजली पण मागणी घटली; ‘ग्रीन फटाक्यां’ना मात्र पसंती

वेगवान मराठी/ एकनाथ भालेराव
येवला /दिनांक: 17 ऑक्टोबर 2025
येवला पूर्व भागातील व्यापारी पेठात फटाक्यांची दुकानं सजली आहेत. मात्र पारंपरिक फटाक्यांच्या मागणीत लक्षणीय घट झाल्याचे चित्र दिसत आहे. नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी संकटात सापडले आहेत. शेतीमालाला भाव नाही, सर्वत्र वाढलेली महागाई — यामुळे यंदाची दिवाळी कशी जाईल, याची चिंता सर्वांनाच आहे.
तरीदेखील, “लहान मुलांचा हट्ट आणि आतिषबाजी नाही तर दिवाळी नाही” हे समीकरण मात्र अजूनही कायम आहे. दुकाने थाटली आहेत, पण अजून ग्राहक नाहीत. त्यातच ग्राहकांमध्ये वाढलेली पर्यावरण-जागृती, शेतीतील आर्थिक अडचणी आणि प्रदूषणाबाबत वाढलेली संवेदनशीलता — या अनेक कारणांमुळे फटाक्यांच्या विक्रीवर मोठा परिणाम झाला आहे.
मात्र, या पार्श्वभूमीवर ग्राहकांची पसंती आता कमी प्रदूषण करणाऱ्या ‘ग्रीन फटाक्यां’कडे वळत आहे. पारंपरिक फटाक्यांमुळे होणारे प्रदूषण आणि आरोग्यावर होणारे दुष्परिणाम लक्षात घेता ‘हरित फटाक्यां’ची नवी लाट ग्रामीण बाजारात पोहोचली आहे. हे फटाके किंचित महाग असले तरी त्यांची उपलब्धता आता मुबलक असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. तज्ज्ञांच्या मते, ग्रीन फटाक्यांमुळे साधारणतः ३० ते ४० टक्के प्रदूषण कमी होते.
फटाक्यांशिवाय दिवाळी साजरी करणे ग्रामीण भागात जवळपास अशक्य असते; मात्र यंदा आरोग्य आणि पर्यावरण या दोन्हींचा विचार करून ग्राहक अधिक जबाबदारीने खरेदी करत असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, ग्रामीण बाजारपेठेत फटाक्यांची दुकाने सज्ज झाली असून, फॅन्सी आणि आकाशात रंगीबेरंगी कारंजे उडणारे फटाक्यांकडं कल वाढला आहे मोठा आवाज करणाऱ्या फटाके कडे कल कमी झाला आहे.
हरित फटाक्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे.
*************
“मोठी गुंतवणूक करून फटाके विक्रीसाठी आणले आहेत. शेतकरी अडचणीत असल्याने सर्व माल विक्री होईल की नाही याची चिंता आहेच. सध्या थंड प्रतिसाद असला तरी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ग्राहकांची झुंबड उडते,”
यावेळी अतिवृष्टीमुळे शेतकरी संकटात असल्यामुळे आम्ही शेतकऱ्यांसाठी सवलतीच्या दरात फटाके उपलब्ध करून देत आहे
— संजय भोसले, संचालक, शिव काशी फटाका, अंदरसूल
****************



