देवळा तालुक्यात वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू

देवळा तालुक्यात वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू
मनोज वैद्य/ दहिवड
अचानक पाऊस चालू झाल्याने घराजवळ लिंबाच्या झाडाजवळ आश्रयाला उभ्या असलेल्या शेतकऱ्याचा वीज पडून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (दि.२०) रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास वऱ्हाळे ता.देवळा येथे घडली. केदा यादव खैरनार (५१) असे वीज पडून मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार, देवळा तालुक्यातील वऱ्हाळे येथील शेतकरी केदा यादव खैरनार शनिवार दिनांक २० सप्टेंबर रोजी दुपारच्या सुमारास शेतात काम करीत असताना अचानक पाऊस आल्याने घराशेजारील लिंबाच्या झाडाखाली आश्रयास थांबले. मात्र त्याचवेळी सदर लिंबाच्या झाडावर वीज पडून त्याचा झटका केदा खैरनार यांना बसला. वीज पडल्याने लिंबाचे झाडाचा काही भाग देखील जळून खाक झाला आहे. स्थानिक नागरिकांनी त्यांना मालेगाव येथे शासकीय रुग्णालयात नेले असता तेथील डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले.

शवविच्छेदना नंतर मृत केदा खैरनार यांच्यावर रात्री ८.३० वाजता शोकाकुल वातावरणात वऱ्हाळे येथील अमरधाम येथे अंतिम संस्कार करण्यात आले. त्यांच्या लक्षात पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ असा परिवार आहे.
अचानक झालेल्या नैसर्गिक आपत्तीत घरातील कर्ता पुरुष मृत पावल्याने कुटुंबीयांवर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे तरी याबाबत प्रशासकीय स्तरावर मदत मिळावी अशी मागणी करण्यात येत आहे.
तर सदर घटनेबाबत माहिती मिळताच प्रशासकिय कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा कारवाईची तजबीज सुरू केल्याची माहिती देवळा तालुका प्रशासकीय यंत्रणेने दिली आहे.



