महाराष्ट्र,देश

खणेपुरीत ज्ञानाची पालखी; श्री सूत्रपाठ ग्रंथ पालखी सोहळ्याने दुमदुमले गाव

खणेपुरीत ज्ञानाची पालखी; श्री सूत्रपाठ ग्रंथ पालखी सोहळ्याने दुमदुमले गाव

वेगवान मराठी | एकनाथ भालेराव

येवला/ दिनांक 7 फेब्रुवारी/ श्री चक्रधर स्वामी विचार प्रबोधिनी सेवाभावी संस्थेच्यावतीने प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही श्री क्षेत्र खणेपुरी (ता. जालना) येथे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांच्या श्रीकृष्णनाथ महानुभाव देवस्थानात केसिराज व्यास रचित श्री श्री सूत्रपाठ ग्रंथ महाराज पालखी सोहळा भक्तिमय वातावरणात मोठ्या उत्साहात पार पडला.
सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी चरणांकित भारद्वाज वेध तीर्थस्थान व १०८ कोटी नामस्मरण मंदिर असलेल्या श्रीकृष्णनाथ महानुभाव देवस्थानात हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. महानुभाव पंथाचे संस्थापक श्री चक्रधर स्वामी यांच्या मुखातून निघालेल्या वचनांवर आधारित लीळाचरित्र ग्रंथातील निवडक वचनांचा संग्रह असलेल्या सूत्रपाठ ग्रंथाच्या पालखी मिरवणुकीने संपूर्ण खणेपुरी गाव दुमदुमून गेले.
दुपारी मान्यवरांच्या हस्ते धर्मध्वजारोहण करण्यात आले. मनीषा राजेश टोपे यांच्या हस्ते देवस्थानात पूजाविधी पार पडला. त्यानंतर फुलांनी सजवलेल्या पालखीत सूत्रपाठ ग्रंथ महाराज व भगवान श्रीकृष्ण यांची मूर्ती विराजमान करून गावातून पालखी मिरवणूक काढण्यात आली.
ज्ञानाची पालखी – अभिनव उपक्रम
ग्रंथांचे तत्त्वज्ञान सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावे या उद्देशाने महंत श्री प्रज्ञासागर बाबा महानुभाव यांनी सन २००० मध्ये ‘ज्ञानाची पालखी’ हा अभिनव उपक्रम सुरू केला. यंदा या उपक्रमाचे २६ वे वर्ष असून विविध भागांतून आलेल्या भाविकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.
पालखी मिरवणुकीदरम्यान होजेवर चक्रधर स्वामी व महानुभाव पंथाची भक्तिगीते सादर करण्यात आली. हातात पांढरे ध्वज घेतलेले पुरुष, तरुण, तसेच डोक्यावर कलश घेऊन सहभागी झालेल्या महिलांनी “जय श्री दत्ता, अवधूता, पतीत पावना अत्रिसूता”, “गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला” अशा भजनांच्या जयघोषाने परिसर भारावून टाकला.
पालखी मार्गावर ठिकठिकाणी सडा, रांगोळ्या काढून ग्रामस्थ व महिलांनी पालखी व महंत श्री प्रज्ञासागर बाबा महानुभाव यांचे मनोभावे दर्शन घेतले.
घोडा-गाडीतून उपाध्य लोणारकरबाबा, महंत श्री केशराज बाबा कपाटे, विष्णू बाबा शेवलीकर, येलेराज बाबा, संतोष मुनी शास्त्री, आचार्य श्री भोजने यांच्यासह अनेक धर्माचार्य सहभागी झाले होते. या पालखी सोहळ्यात सुमारे दोन हजार भाविकांनी सहभाग घेतला.
सकाळपासून महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. पालखी सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी महंत श्री प्रज्ञासागर बाबा महानुभाव, संस्थानचे सचिव उद्धवराज प्रज्ञासागर बाबा महानुभाव तसेच विश्वस्त व सेवेकऱ्यांनी परिश्रम घेतले.

एकनाथ भालेराव

वेगवान ऑनलाईनमध्ये येवला तालुका प्रतिनिधी म्हणून कार्यरत. २४ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. गांवकरी, देशदूत,, पुण्यनगरी, लोकमत पत्रकार म्हणून काम. २०१४ पासून वेगवान न्यूज, वेगवान नाशिक, वेगवान मराठी नेटवर्कचे येवला प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे. राजकारण, टेक, क्राईम, शेती, उद्योग, खेळ, बीजनेस आदी विषय सखोल माहिती , व लेखनाची आवड

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!