संत परंपरेतील श्री.संत सावता महाराज हे शिरोमणी – मंत्री छगन भुजबळ
संत परंपरेतील श्री.संत सावता महाराज हे शिरोमणी - मंत्री छगन भुजबळ

वेगवान नाशिक / एकनाथ भालेराव
येवला,दि.२० जुलै 2025:- संत परंपरेतील श्री.संत सावता महाराज हे शिरोमणी आहे.संत सावता महाराज यांनी आपल्या कर्मात परमेश्वर आहे, कर्म हे श्रेष्ठ आहे असा संदेश दिला. त्यांच्या विचारांवर आपण काम करत असून मतदारसंघातील जनतेची सेवा करणे हेच आपले कर्म आहे असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले.
दत्तवाडी, सावता महाराज मंदिर, येवला येथे संत शिरोमणी सावता माळी संजीवन समाधी सोहळा निमीत्त आयोजित अखंड हरिनाम सोहळ्यास मंत्री छगन भुजबळ यांनी उपस्थिती लावली. यावेळी श्री संत सावता महाराज मंदिरात नतमस्तक होत मंत्री छगन भुजबळ मनोभावे दर्शन घेतले.
यावेळी हभप नीलेश महाराज पवार, अल्पसंख्यांक आयोगाचे सदस्य हुसेन शेख, ज्येष्ठ नेते अरुणमामा थोरात, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे येवला विधानसभा उपाध्यक्ष दत्ता निकम, मनोज थळकर, संजय थळकर, साहेबराव गायकवाड, मयूर थळकर, सचिन सोनवणे, गोटू मांजरे, सुमित थोरात, अविनाश कुक्कर, मालिक मेंबर, महेश गादेकर, विकी बिवाल, संतोष राऊळ, भाऊसाहेब धनवटे, प्रीतम शहारे, गणेश गवळी, सौरभ जगताप, दीपक पवार यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हणाले की,श्री संत सावता महाराज यांच्या अरण या तीर्थ स्थळासाठी १५० कोटी रुपयांचा विकास आराखड्यास राज्य मंत्री मंडळाची मंजुरी मिळाली आहे. लवकरच निधी प्राप्त होऊन या परिसराचा विकास होणार आहे. राज्यात ज्या ठिकाणी संतांची जी जमस्थळे व कर्मभूमी आहे त्या त्या परिसरात राज्य सरकारच्या वतीने विविध विकास कामे करून त्या स्थळांचा विकास करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले की, राज्यात जी संत मंडळी होऊन गेली त्यांनी समतेचा समानतेचा संदेश दिला. समाज परिवर्तन घडवून आणण्यासाठी त्यांनी आपले विचार मांडले. त्यांचे विचार हाच आपला महाराष्ट्र धर्म आहे. त्यामुळे या संतांचे विचार आपण सर्वांनी पुढे घेऊन जावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले. तसेच मतदारसंघातील जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी तसेच त्यांची सेवा करण्यासाठी आपले सातत्याने प्रयत्न असून तेच आपले कर्म आहे. जनतेची सेवा करणे हेच आपले कर्म असल्याचे त्यांनी सांगितले.



