महाराष्ट्र,देश

भगवानदास खरोटे यांचा विश्वविक्रम: गोल्डन आईज ऑफ इंडियाचा बहुमान

वेगवान नाशिक / बाबा पवार

देवळा : एका मिलीमीटरपेक्षाही कमी आकाराची सोन्याची गणेशमूर्ती तयार करून जागतिक विक्रम करणारे देवळा येथील भगवानदास भालचंद्र खरोटे यांना ‘गोल्डन आईज ऑफ इंडिया’ या बहुमानाने गौरवण्यात आले. देवळा येथे आयोजित एका विशेष कार्यक्रमात त्यांना ‘ एसीइ बुक ऑफ रेकॉर्ड्स’ आणि ‘ओएमजी बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स’ हे पुरस्कार प्रदान करण्यात आले.

जवळपास ३२ वर्षांपूर्वी हरभऱ्याच्या डाळीवर सूक्ष्म गणेशमूर्ती तयार करून आपल्या कलेची सुरुवात करणाऱ्या भगवानदास खरोटे यांनी अथक परिश्रम, संयम आणि चिकाटीच्या जोरावर एकाच वेळी चार विश्वविक्रम प्रस्थापित केले आहेत. त्यांच्या या विक्रमामुळे देवळा शहराचे नाव जागतिक नकाशावर ठळकपणे उमटले आहे.

या सन्मान सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी देवळा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा भाग्यश्री पवार होत्या. उपनगराध्यक्ष संजय आहेर, पोलिस निरीक्षक सार्थक नेहेते आणि ‘एसीइ बुक ऑफ रेकॉर्ड्स’ व ‘ओएमजी बुक ऑफ रेकॉर्ड्स’च्या समन्वयक डॉ. अनिता गुप्ता यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. डॉ. गुप्ता यांच्या हस्ते खरोटे यांना मानपत्र, सन्मानचिन्ह आणि ट्रॉफी देऊन गौरवण्यात आले.

यावेळी बोलताना नगराध्यक्षा भाग्यश्री पवार म्हणाल्या, “भगवानदास खरोटे यांची कला भावी पिढ्यांसाठी प्रेरणादायी आहे. हे यश केवळ त्यांचे वैयक्तिक यश नसून, देवळा तालुक्याचा सन्मान आहे.” आपल्या भावना व्यक्त करताना खरोटे म्हणाले, “३२ वर्षांचा हा प्रवास खूप खडतर होता, परंतु बाप्पावरील माझ्या श्रद्धेमुळे मी डगमगलो नाही. हा सन्मान माझ्या गावाचा आणि माझ्या मातृभूमीचा आहे.”

भगवानदास खरोटे यांनी केलेले जागतिक विक्रम:
  •   ०.७६ मिलीमीटर आकाराची जगातील सर्वात सूक्ष्म सुवर्ण गणेशमूर्ती.
  •   सव्वा चौरस इंच जागेत २५६ विविध भावमुद्रा असलेल्या गणेशमूर्ती.
  •   जगातील सर्वात लहान सोन्याची किटली आणि कपबशी.
  • तबला, हार्मोनियम, सतार, शहनाई यांसारख्या वाद्यांसह बाप्पाची सर्वात लहान मूर्ती.

त्यांच्या या विक्रमांमुळे, कला आणि कौशल्याच्या जोरावर कोणतीही गोष्ट साध्य करता येते, हे त्यांनी सिद्ध केले आहे.

  “३२ वर्षांचा प्रवास खूप खाचखळग्यांचा होता. अनेक अडचणी आल्या, परंतु बाप्पांवर असलेली अढळ श्रद्धा व विश्वास कधी ढळला नाही. हा सन्मान माझ्या गावाचा, माझ्या मातृभूमीचा आहे. या गौरवामागे माझ्या कुटुंबीयांची, नागरीकांची प्रेरणा व पाठबळ आहे.
— भगवानदास खरोटे 

बाबा पवार

गेल्या १७ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. दैनिक देशदूत, लोकमत, आपलं महानगर, नवराष्ट्र, स्वतंत्र भारत आदी दैनिक, AM न्युज TV चॅनल, नाशिक सिटी न्युज आदी इलेक्ट्रॉनिक चॅनल, वेगवान न्यूज तालुका प्रतिनिधी म्हणून कामाचा अनुभव. राजकीय, सामाजिक, गुन्हेगारी, शैक्षणिक, शेती, यशोगाथा, आदी विषयावर विशेष लिखाणाची आवड.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!