शेतकरी एकवटला तर सरकार उठाबशा काढेल: बच्चू कडू; २८ तारखेला ‘चलो नागपूर’चे आवाहन

देवळा : शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफी आणि अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीच्या त्वरित मदतीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते आमदार बच्चू कडू यांची राज्यव्यापी ‘शेतकरी, शेतमजूर हक्क यात्रा’ नाशिक जिल्ह्यात दाखल झाली आहे. दि. ४ ऑक्टोबर रोजी देवळा तालुक्यातील खामखेडा येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य शेतकरी मेळाव्यात बोलताना बच्चू कडू यांनी सरकारवर सडकून टीका केली आणि शेतकरी एकजुटीचे आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गणेश यांनी केले.
बच्चू कडू म्हणाले की, धर्माच्या नावावर लगेच पेटून उठणारे लोक शेतकरी आत्महत्या करत असताना गप्प का? स्वातंत्र्य मिळाल्यापासून शेतकऱ्यांचे एकही वर्ष आले नाही. सरकारी कर्मचारी एकसंघ असल्याने न सांगता वेतन आयोग वाढतात, पण शेतकरी एकसंघ नसल्याने एक स्वामिनाथन आयोग लागू होत नाही. शेतकऱ्यांचे अस्तित्व दाखवण्यासाठी २८ तारखेला नागपूरला यावे लागेल. ‘झेंड्यांचे राजकारण करू नका, जातीच्या बाहेर जाऊन शेतकरी म्हणून एकत्र या. शेतकरी एकजूट होऊन रस्त्यावर उतरला तर सरकार उठाबशा काढेल,’ असे ते म्हणाले. २८ नंतर बदल दिसेल, शेतकऱ्यांसाठी बजेट ठेवल्याशिवाय नागपूर सोडणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.
यावेळी प्रहार जिल्हा अध्यक्ष गणेश निंबाळकर यांनी केंद्राच्या पथकावर टीका केली. पीक खराब झाले हे पाहण्यासाठी कुणी आले नाही, पण कांदा चाळीतील कांदा आहे का हे जाणून घेण्यासाठी पथक आले. ‘याचा अर्थ त्यांना पिकवणाऱ्याची नव्हे, तर खाणाऱ्याची काळजी आहे.’ कांद्याचा ‘क’ माहीत नसलेल्या कंपन्या शेतकऱ्यांच्या जीवावर कोट्यवधी रुपये कमवत आहेत. कांदा निर्यात बंदी कोणी केली, यामुळे शेतकऱ्यांची आयुष्ये बॅन झाली, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. निंबाळकर यांनी शेतकऱ्यांसाठी पायाला सूज येईपर्यंत संघर्ष करणाऱ्या बच्चू कडू यांना पाठिंबा देण्यासाठी २८ तारखेला नागपूरला येण्याचे आवाहन केले.
प्रा. यशवंत गोसावी यांनी कांदा निर्यात धोरणाबाबत सरकारला धारेवर धरले. कर्जमाफीचे आश्वासन, शेतकरी आत्महत्या, मुलांना दिवाळीसाठी कपडे घेण्यासाठी पैसे नसणे यावर सत्ताधारी बोलत नाहीत, फक्त बच्चू कडू बोलत आहेत. कुंभमेळ्यात सेवा नव्हे तर मेवा खाण्यासाठी पालकमंत्री पद वादात अडकले आहे, अशी टीका त्यांनी केली.



