नाशिक ग्रामीणनाशिक शहर
कांदा उत्पादन परवडेनासे; खर्च व उत्पन्नाचा मेळ बसेना – शेतकऱ्यांची व्यथा
NANGAON NEWS
कांदा उत्पादन परवडेनासे; खर्च व उत्पन्नाचा मेळ बसेना – शेतकऱ्यांची व्यथा
वेगवान मराठी : मारुती जगधने
दि. 19 जानेवारी 2026 रोजी नांदगांव जि. नाशिक बाजारात कांद्याचा लिलाव भाव प्रतिक्विंटल 1000, 1250,1520 रुपयांच्या दरम्यान राहिला. मात्र या भावात कांदा विकूनही शेतकऱ्यांच्या पदरी समाधान उरत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. कारण कांदा उत्पादनावर होणारा वाढता खर्च आणि मिळणारे उत्पादन यांचा ताळमेळ बसत नाही, अशी प्रतिक्रिया अनेक शेतकरी व्यक्त करत आहेत.
शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार कांदा पिकासाठी एकरी साधारण ५० ते ६० हजार रुपये खर्च येतो. यात बी-बियाणे, खते, कीटकनाशके, मजुरी, पाणी, वाहतूक तसेच स्वतःची मेहनत यांचा समावेश आहे. याउलट एकरी उत्पादन केवळ ५० ते ६० क्विंटल इतके मिळते. सध्याच्या बाजारभावानुसार उत्पन्न आणि झालेला खर्च जवळपास समान होत असून नफा मिळणे तर दूरच, अनेक वेळा तोट्याची वेळ येत आहे.
“कांदा पिकवणे परवडत नाही, हे माहित असूनही नगदी पैसे मिळणारे पीक म्हणून कांदा घ्यावा लागतो,” अशी व्यथा शेतकरी व्यक्त करत आहेत. इतर पिकांच्या तुलनेत कांदा विकल्यानंतर लगेच पैसे मिळतात, त्यामुळे आर्थिक गरजांपोटी शेतकरी कांदा उत्पादनाकडे वळतात. मात्र बाजारातील चढ-उतार, वाढता उत्पादन खर्च आणि अपेक्षित दर न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडत आहे.
खते, औषधे आणि मजुरीचे दर सातत्याने वाढत असताना कांद्याच्या भावात मात्र अपेक्षित वाढ होत नसल्याने शेतकऱ्यांची कोंडी होत आहे. यामुळे कांदा उत्पादक शेतकरी हतबल झाले असून शासनाने उत्पादन खर्च लक्षात घेऊन हमीभाव किंवा बाजारभाव स्थिर ठेवण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी शेतकरी वर्गातून होते .
कृषी उत्पन्न बाजार समिती नांदगाव(नाशिक)
सोमवार दि.19/01/2026
( सकाळ सत्र)
बोलठाण उपबाजार
कांदा बाजारभाव खालीलप्रमाणे
लाल कांदा
कमी:- 200
जास्त:- 1502
सरासरी:- 1350
एकूण लिलाव झालेली वाहने:- 380 नग
कृषी उत्पन्न बाजार समिती नांदगाव(नाशिक)
सोमवार दि.19/01/2026
(सकाळ सत्र
लाल कांदा
कमी:-300
जास्त:-1520
सरासरी:-1350
एकूण लिलाव झालेली वाहने:- 420 नग
शिल्लक वाहने -200 नग



