अजब प्रकार : २ लाख २० हजार सह सोन्याचे मंगळसूत्र चोरीला गेल्याची खोटी फिर्याद, प्रत्यक्षात ९०० रुपये आणि नकली दागिने चोरीला

वेगवान नाशिक / बाबा पवार
देवळा : तालुक्यातील मेशी येथील एका शेतकऱ्याने, २ लाख २० हजार रुपयांची रोकड आणि तीन तोळ्यांचे सोन्याचे मंगळसूत्र चोरीला गेल्याची खोटी तक्रार देवळा पोलीस ठाण्यात दाखल केली होती. पोलिसांनी २४ तासांच्या आत तपास करून एका संशयिताला पकडले, पण चौकशीत धक्कादायक सत्य समोर आले.
मेशी गावातील शेतकरी नामदेव वेडू सिरसाठ यांनी रविवारी त्यांच्या शेतातील घरात चोरी झाल्याची तक्रार पोलिसांत केली होती. तक्रारीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी लगेच तपासाला सुरुवात केली. सीसीटीव्ही फुटेज, गुप्त माहितीदार आणि तांत्रिक तपास यांच्या मदतीने पोलिसांनी अवघ्या ४८ तासांत पिंपळगाव बसवंत येथून एका संशयित आरोपीला ताब्यात घेतले.
परंतु, पोलिसांनी सखोल चौकशी केली असता, सत्य समोर आले. आरोपीच्या ताब्यातून जप्त केलेल्या वस्तूंची तपासणी केली असता, चोरीला गेलेली रक्कम फक्त ९०० रुपये होती आणि कथित सोन्याचे मंगळसूत्र नकली होते. यानंतर पोलिसांनी तक्रारदार नामदेव सिरसाठ आणि त्यांच्या पत्नीकडे चौकशी केली. त्यांनी गावच्या दोन व्यक्तींच्या सांगण्यावरून चोरीची रक्कम आणि दागिन्यांची किंमत वाढवून सांगितल्याची कबुली दिली.



