मुदत बाह्य औषध जाळण्याचे वृत्त प्रसिद्ध होताच संबंधित विभागाकडून चौकशी

वेगवान नाशिक/सागर मोर
वणी: येथील ग्रामीण रुग्णालयात मुदत बाह्य झालेल्या औषधांसोबत मुदत न संपलेली औषधेही जाळल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे रुग्णालयाच्या कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. वेगवान नाशिकने यासंदर्भात वृत्त प्रकाशित केल्यानंतर जिल्हा प्रशासनाने तातडीने चौकशीचे आदेश दिले होते. मात्र, ही चौकशी वरवरची असल्याचे प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींच्या पाहणीत समोर आले आहे.
काय घडलं?
दिनांक ५ ऑगस्ट रोजी वणी ग्रामीण रुग्णालयाच्या आवारात मोठ्या प्रमाणात मुदत बाह्य औषधे उघड्यावर जाळून त्यांची विल्हेवाट लावण्यात आल्याचा प्रकार घडला होता. याविषयी वृत्त प्रकाशित झाल्यानंतर उपसंचालक विभागाकडून सहाय्यक संचालक डाॅ.योगेश चित्ते व जिल्हा रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डाॅ.संदिप सुर्यवंशी यांच्यासह एक चौकशी समिती वणीत दाखल झाली. त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली.
चौकशीत काय आढळलं?
ही चौकशी समिती परत गेल्यानंतर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी पुन्हा घटनास्थळाची पाहणी केली. त्यावेळी त्यांना अनेक अर्धवट जळालेली औषधे आढळली. त्यांची तपासणी केली असता, त्यातील काही औषधांची मुदत संपलेली नव्हती असे आढळून आले. याबाबत पुन्हा चौकशी समितीला बोलवून हा प्रकार त्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आला.या घटनेमुळे रुग्णालयाच्या प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
‘सर्व औषधांची तपासणी करून दोषींवर कठोर कारवाई करू, कुणालाही पाठीशी घालणार नाही,’ असे चौकशी समितीने सांगितले असले तरी, ही कारवाई केवळ ‘वरवरची’ असल्याचा आरोप होत आहे.रुग्णालयातील औषधांच्या विल्हेवाटीबाबतची ही गंभीर चूक आरोग्य विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. या प्रकरणी दोषींवर कोणती कारवाई होते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
या प्रकारच्या गंभीर अनियमिततेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये आणि रुग्णांमध्ये भीतीचे वातावरण आहे.



