नांदगाव | वाहतूक कोंडीचा मुद्दा – हुतात्मा चौकात अतिक्रमणाने निर्माण केली गंभीर समस्या
वेगवान मराठी : मारुती जगधने
नांदगाव ( 753 J नॅशनल हायवे) येथील हुतात्मा चौकात दररोज वाहतूक कोंडीचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. चौकाच्या एका बाजूस हातगाड्यांची, तर दुसऱ्या बाजूस ॲटो रिक्षांची अनधिकृत पार्किंग व थांबे यामुळे संपूर्ण परिसरात वाहतूक खोळंबते.
हुतात्मा स्मारकाजवळील परिसरात दिवसेंदिवस अतिक्रमणाची स्पर्धाच सुरू असल्याचे चित्र आहे. स्मारकाच्या भोवती बेकायदेशीर गाड्यांचे थांबे, रस्त्यावर उभ्या हातगाड्या, स्थानिक विक्रेत्यांचे अतिक्रमण यामुळे वाहनचालकांना अक्षरशः नाकी नऊ येत आहेत.
या परिसरातून दररोज शालेय वाहने, खासगी चारचाकी व मालवाहतूक ट्रक यांचा मोठा वर्दळ असतो. मात्र, अतिक्रमणामुळे मार्ग अरुंद झाला असून वाहतुकीची गती मंदावली आहे. त्यामुळे रोज अपघाताची शक्यता वाढली आहे, तसेच शालेय विद्यार्थ्यांना व नागरिकांना जीव मुठीत घेऊन या मार्गाने जावे लागते.
स्थानिक प्रशासनाने वारंवार सूचना देऊनही अतिक्रमण हटवले जात नाही. यावर नगरपरिषद व पोलीस प्रशासनाने संयुक्त कारवाई करणे गरजेचे झाले आहे, अशी जोरदार मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.



