नाशिक ग्रामीण

निफाडमध्ये गोळीबार प्रकरणातील आरोपी जेरबंद! स्थानिक गुन्हे शाखा व निफाड पोलिसांची संयुक्त कारवाई….

वेगवान नाशिक / किरणकुमार आवारे

शिरवाडे वाकद दि.७ ऑक्टो २०२५ :- निफाड पोलीस ठाणे हद्दीत झालेल्या गोळीबार व जिवघेणा हल्ला प्रकरणातील फरार आरोपींना निफाड पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुद्देमालासह अटक करण्यात यश मिळवले आहे.
दि.३ ऑक्टोबर रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास जळगाव फाटा येथील आसिफ किराणा दुकानासमोर सिद्धार्थ मनोहर साळवे (वय २७, रा. सुंदरपूर, ता. निफाड) याच्यावर जुन्या वैमनस्यातून गोळीबार करण्यात आला होता. गावठी पिस्तूलातून झाडलेल्या तीन गोळ्या त्याच्या अंगावरून गेल्या असून, कमरेजवळील बरगडी व खांद्याला दुखापत झाली होती. या प्रकरणी निफाड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३२६/२०२५ भा.दं.वि. कलम १०९, ३५१(२), ३५२, ६१(२), ३(५) व शस्त्र कायद्यांतर्गत नोंदवण्यात आला होता.
घटनेची माहिती मिळताच नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी के. के. पाटील यांनी तातडीने आरोपींचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि. रविंद्र मगर व निफाड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गणेश गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार करण्यात आले. या पथकाने तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने आरोपींचा मागोवा घेत अखेर सहा आरोपींना अटक केली. त्यात मयुर राजेंद्र ढगे (रा. बेघरबस्ती, निफाड), विजय महेश शिंदे (रा. मटण मार्केटसमोर, निफाड), विशाल आशोक केंदळे (रा. आगस्तीनगर, निफाड), पृथ्वीराज जाधव (रा. काथरगाव), आयुष संतोष भावसार (रा. शंकरनगर, निफाड), सिद्धार्थ राजु साळवे (रा. जळगाव, निफाड) यांचा समावेश आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी के. के. पाटील यांच्या देखरेखीखाली पार पडली. स्थानिक गुन्हे शाखा व निफाड पोलीस ठाण्याच्या एकत्रित प्रयत्नातून गुन्ह्यातील आरोपींना जेरबंद करून प्रकरण उघडकीस आणण्यात आले आहे.

◆ आरोपींकडून खालील मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे
घटनास्थळावर सापडलेली एक गोळी (सस्पेक्टेड बुलेट), रेडमी, वन प्लस, टेक्नो आदी कंपन्यांचे एकूण चार मोबाईल, एक १६ जी बी क्षमतेचा पेनड्राईव्ह ज्यात आरोपींचे फोटो व कॉल रेकॉर्डिंग आढळले.

किरणकुमार आवारे

किरणकुमार आवारे हे गेली ३० वर्षांपासून प्रिंट मीडियात काम करत आहेत. याकाळात त्यांनी दैनिक देशदूत, दैनिक लोकमत, दैनिक गांवकरी, दैनिक उलाढाल, दैनिक तरुण भारत, दैनिक सार्वमत, दैनिक आधुनिक केसरी, दैनिक लक्ष महाराष्ट्र, लोकनामा मध्ये काम केले आहे व करत आहेत. दैनिक लोकनामा मध्ये त्यांनी सलग १५० भाग गावगाडा हे सदर चालवले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!