पुरोगामी महाराष्ट्रातील धक्कादायक प्रकार ; द्राक्ष पंढरी निफाडमध्ये काळ्या जादूचा थरार; राजकीय वैरातून निफाडच्या बड्या नेत्यावर काळी जादू करत जीवे मारण्याची सुपारी ; शेतात आढळल्या बाहुल्या, लिंबू व धमकीच्या चिठ्ठ्या…

वेगवान नाशिक / किरणकुमार आवारे
शिरवाडे वाकद:- निफाड नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष अनिल पा. कुंदे यांना जादूटोण्याच्या माध्यमातून जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून, याप्रकरणी निफाड पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अनिल कुंदे यांच्या शेतातील बांधावर रात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने लिंबांमध्ये टाचण्या टोचलेल्या, बिबे, हिरव्या बांगड्या तसेच नारळावर शेंदूर लावलेला प्रकार केला होता. याच ठिकाणी टाचण्या टोचलेल्या तीन काळ्या बाहुल्या आढळून आल्या असून, प्रत्येक बाहुलीला स्वतंत्र चिठ्ठी बांधलेली होती.
हा प्रकार शेतात कामानिमित्त गेलेले जयदीप कुंदे यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तात्काळ निफाड पोलिसांना माहिती दिली. घटनास्थळी मिळालेल्या चिठ्ठ्यांमध्ये कुंदे कुटुंबातील तिन्ही भावांविषयी धमकीवजा मजकूर लिहिण्यात आला असून, एका चिठ्ठीत उपनगराध्यक्ष अनिल पा. कुंदे यांना “तुम्हाला मारण्याची सुपारी मला दिली आहे” अशा शब्दांत थेट जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. उर्वरित चिठ्ठ्यांमध्ये उत्तम कुंदे व सुनील कुंदे यांच्याबाबतही इशारादायक उल्लेख करण्यात आला आहे. धमकीच्या चिठ्ठ्यांमध्ये काळी जादू, तांत्रिक उपाय व अमंगल शक्तींचा उल्लेख असल्याने संबंधितांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या घटनेमुळे निफाड परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत निफाड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र बाविस्कर, पोलीस कर्मचारी नितीन सांगळे, विनोद जाधव व भास्कर पवार यांनी घटनास्थळी पाहणी केली.
धमकीच्या चिठ्ठ्या ताब्यात घेऊन त्या हस्ताक्षर तज्ज्ञ व फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठविण्यात आल्या असून, संशयितांचा शोध सुरू आहे. तपास पूर्ण झाल्यानंतर दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे पोलिस प्रशासनाने स्पष्ट केले आहे. काळ्या जादूटोण्याच्या नावाखाली भीती निर्माण करून गुन्हेगारी वृत्ती ने दबाव टाकण्याचा हा प्रकार समाजात चिंतेचा विषय ठरत असून, अशा अंधश्रद्धा व गुन्हेगारी कृत्यांविरोधात कठोर कारवाईची मागणी नागरिकांकडून होत आहे.
* हा प्रकार राजकीय हेतूने प्रेरित आहे. समाजामध्ये चांगले काम करणाऱ्यांना विरोधक असतात. माझ्या राजकीय अस्तित्वाला पायबंद घालण्यासाठी हा किळसवाणा प्रकार करण्यात आला असावा. गेल्या २५ वर्षांपासून मी गोरगरीब जनता व निफाड शहराच्या विकासासाठी काम करत आहे. अशा घाणेरड्या प्रवृत्तीमुळे मी घाबरणार नाही. कोणी कितीही जीवे मारण्याची सुपारी दिली तरी मी थांबणार नाही.
अनिल पाटील कुंदे
उपनगराध्यक्ष, निफाड
* महाराष्ट्रात अंधश्रद्धा निर्मूलन कायदा होऊन १३ वर्षे झाली असली तरी, त्याची कडक अंमलबजावणी होताना दिसत नाही. कायद्याची प्रभावी अंमलबजावणी झाली तर अशा अंधश्रद्धायुक्त व गुन्हेगारी प्रकारांना मोठ्या प्रमाणात आळा बसेल. नागरिकांनी अशा तोडग्यांवर विश्वास ठेवू नये आणि असे प्रकार आढळल्यास तात्काळ पोलीस किंवा अंनिस कार्यकर्त्यांना कळवावे.
डॉ.टी. आर. गोराणे
प्रधान सचिव, अंधश्रद्धा निर्मूलन समिती



