लोकल बातम्या

जनताच नगरसेवक : डिजिटल नांदगावकडे एक पाऊल

Nandgaon News

जनताच नगरसेवक : डिजिटल नांदगावकडे एक पाऊल

दिनांक 23 जानेवारी 2026

नांदगाव नगर परिषदेतील नवनिर्वाचित नगराध्यक्ष, गटनेते व सर्व नगरसेवक यांचे मनःपूर्वक अभिनंदन. लोकशाहीत जनता हीच खरी ताकद असते आणि त्या अर्थाने “जनताच नगरसेवक” ही संकल्पना आजच्या काळात अत्यंत समर्पक ठरते.
नांदगाव नगरपालिकेने “जनताच नगरसेवक” या नावाने अधिकृत डिजिटल ग्रुप सुरू करून त्यामध्ये नांदगाव शहरातील नागरिकांना सहभागी करून घ्यावे. या माध्यमातून वेळोवेळी सूचना, माहिती व सेवा नागरिकांपर्यंत थेट पोहोचवता येतील आणि नांदगाव नगरपालिका खऱ्या अर्थाने डिजिटल होईल.
उदाहरणार्थ, नळपट्टी व पाणीपट्टी यासारखी बिले डिजिटल पद्धतीने उपलब्ध केल्यास कर्मचाऱ्यांची गरज भासणार नाही तसेच बिलबुकवरील खर्चही वाचेल. नांदगावमधील प्रत्येक स्ट्रीट लाईटच्या पोलवर क्रमांक टाकल्यास त्या पोलचा फोटो ग्रुपवर टाकून तक्रार नोंदवता येईल. यामुळे स्वतंत्र तक्रार बुक व कर्मचारी यांची बचत होईल. तसेच शहरातील एकूण स्ट्रीट लाईटची संख्या व त्यावर होणारा खर्च नागरिकांनाही पारदर्शकपणे कळेल.
या ग्रुपवर उद्या कोणत्या प्रभागात पाणीपुरवठा होणार आहे, घंटागाडी कोणत्या वेळी येणार आहे, गटारी व रस्ते स्वच्छ झाल्याचे फोटो टाकता येतील. त्यामुळे कोणत्याही प्रभागावर अन्याय होणार नाही आणि प्रशासनाची कार्यक्षमता नागरिकांसमोर येईल.
सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने सार्वजनिक शौचालयांच्या बाजूला नळ कनेक्शन देऊन संबंधित प्रभागात नियमित स्वच्छता कर्मचारी पाठवावेत. यामुळे परिसर स्वच्छ, कचरामुक्त व डासमुक्त राहील.
नगरपालिका हॉलमध्ये वेळोवेळी महापुरुषांच्या जयंती कर्मचारी व नगरसेवकांच्या उपस्थितीत साजऱ्या कराव्यात. नांदगावमधील भाजीपाला विक्रेते व टपरीधारक यांची शिस्तबद्ध व योग्य सोय केल्यास रस्त्यांना मोकळा श्वास मिळेल आणि त्यातून नगरपालिकेलाही आर्थिक लाभ होईल.
आग लागल्यास नगरपालिकेकडे स्वतंत्र अग्निशमन वाहन नसल्याने मोठी अडचण निर्माण होते. यासाठी शहरातील पाण्याच्या मुख्य पाईपलाईनवर जागोजागी हायड्रंट किंवा नळ कनेक्शन उपलब्ध करून दिल्यास आपत्कालीन परिस्थितीत त्वरित उपयोग होऊन मोठी हानी टाळता येईल.
नांदगावच्या इतिहासातील महत्त्वाचा ठेवा असलेले नांदगावचे वेश (प्रवेशद्वार) यांचे पुनर्निर्माण केल्यास शहराच्या सौंदर्यात भर पडेल. शनी मंदिर येथील प्रवासी थांबा हुतात्मा चौकात स्थलांतरित केल्यास शनी चौकातील वाहतूक कोंडी कमी होईल. हा थांबा सीसीटीव्हीच्या नजरेखाली असावा, जेणेकरून विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेचा प्रश्न सुटेल.
शनी मंदिर येथील ऐतिहासिक विहिरीचा विकास करून पूल व गार्डनलगत घाट निर्माण करावा, जेथे नागरिकांना दशक्रिया विधीची सुविधा मिळेल. तसेच नगरपालिका इमारतीच्या पाठीमागील शाकंभरी तीर परिसरात संरक्षण भिंत बांधून दुसरा घाट विकसित करावा. यामुळे त्या परिसराचा गैरवापर थांबेल व नागरिकांसाठी सुरक्षित जागा उपलब्ध होईल.
नांदगाव शहर हद्दीतील शासकीय आयटीआय व न्यायालय यांच्यामधील शासकीय जागेवर आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या नावाने क्रीडा संकुल व स्टेडियम उभारल्यास विद्यार्थी-विद्यार्थिनींमध्ये क्रीडा संस्कृती रुजेल व विविध स्तरावर खेळाडू घडतील. तसेच नांदगावमधील रेल्वे इन्स्टिट्यूट रेल्वेकडून भाडेपट्ट्याने घेऊन तेथे विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिकांसाठी अभ्यास व मनोरंजन गार्डन विकसित करावे.
असा सर्वांगीण विकास झाल्यास नांदगावचा इतिहास घडेल—आणि हा इतिहास कोणीही रोखू शकणार नाही.
इतिहास घडणारच… इतिहास घडणारच… इतिहास घडणारच…
जय महाराष्ट्र!
— नांदगाव ची सून, लोकसेविका
ॲडव्होकेट अर्चना आढाव

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!