सुसज्ज बनवलेल्या रस्त्याची तोडफोड
रस्ता बांधणीपूर्वीच‘युटिलिटी डक्ट’चे नियोजन करणे गरजेचे !
वेगवान मराठी : मारुती जगधने
दि . 3 जानेवारी 2026
नांदगांव शहरातील भोंगळे रोडवरील परिस्थिती प्रशासकीय नियोजनाच्या अभावाकडे लक्ष वेधणारी आहे. नुकताच सुसज्जपणे बांधलेला रस्ता जलवाहिनीसाठी पुन्हा खोदण्यात आल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. रस्ता पूर्ण झाल्यानंतर तो पुन्हा खोदणे म्हणजे वेळ, पैसा आणि संसाधनांचा अपव्यय असल्याची भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे.
रस्ता बांधणीसाठी खर्च झालेला सार्वजनिक निधी अल्पावधीतच वाया जात असून, पॅचवर्कमुळे रस्त्याची गुणवत्ता आणि मजबुती कमी होते. सध्या सुरू असलेल्या खोदकामामुळे परिसरात धूळ, प्रदूषण वाढले असून वाहतूक कोंडी व अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी अर्धवट खोदलेले रस्ते वाहनचालकांसाठी धोकादायक ठरत आहेत.
तज्ञांच्या मते, अशा समस्या टाळण्यासाठी रस्ता बांधणीपूर्वीच‘युटिलिटी डक्ट’चे नियोजन करणे आवश्यक आहे. युटिलिटी डक्टमुळे भविष्यात पाणी, वीज, गॅस, इंटरनेट फायबर किंवा इतर केबल्ससाठी रस्ता खोदण्याची गरज भासत नाही. अनेक स्मार्ट शहरांमध्ये ही पद्धत राबवली जात असून त्यामुळे रस्त्यांचे आयुष्य वाढते, खर्चात बचत होते आणि वाहतुकीला अडथळा निर्माण होत नाही.
नांदगांव नगरपालिकेने भविष्यातील रस्ते विकास कामांमध्ये युटिलिटी डक्टचा समावेश केल्यास भोंगळे रोडसारखी परिस्थिती टाळता येईल, अशी मागणी नागरिक व सामाजिक संस्थांकडून होत आहे.
रस्ते बनवा तोडा फोडा पुन्हा पॅच द्या पावसाळा आले की सासले पाणी . की पुन्हां खड्डे .



