नाशिक ग्रामीण

चोरटे थांबता थांबेना ; निफाड तालुक्यातील शिवापूर, देवगाव, नैताळे पाठोपाठ आता या पौराणिक मंदिरातील मौल्यवान वस्तू अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना समोर…

वेगवान नाशिक / किरणकुमार आवारे

शिरवाडे वाकद दिनांक १२ डिसेंबर २०२५ :- निफाड तालुक्यातील शिवापूर, देवगाव, नैताळे पाठोपाठ आता सायखेडा येथील लक्ष्मी नारायण मंदिरातील मौल्यवान वस्तू अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना समोर आली आहे. निफाड तालुक्यात देवस्थानांना लक्ष्य करण्याच्या सलग घटना घडत असल्याने नागरिकांच्या भावना दुखावल्या असून पोलिसांसमोर चोरट्यांनी मोठे आव्हान उभे केले आहे.
फिर्यादी पुजारी सुमित जगदीश तिवारी वय ३८, रा.सायखेडा यांनी दिलेल्या फिर्यादीत, मंदिराच्या दरवाज्याची एक चावी माझ्याकडे असते व दुसरी चावी मंदिरासमोरील तटबंदीजवळील वीज वितरणच्या पेटीत ठेवलेली असते. दि.११ डिसेंबर रोजी सकाळी ८ वाजता मी मंदिर उघडल्यावर मौल्यवान साहित्य चोरीस गेल्याचे लक्षात आले. त्याचबरोबर समोरील दुसरी चावी ठेवलेला वीज वितरणची पेटी उघडलेली व चावी खाली पडलेली दिसली. घटनेबाबत मी मंदीराचे आर्थिक खर्च पाहणारे श्रीनिवास काशीनाथ काबरा, रा.सायखेडा तसेच मंदिराचे वारसदार सर्वेश मालपाणी, रा. वावी आणि संतोष केला, रा.गांधीनगर, नाशिक रोड यांना विचारले असता, त्यांना काही माहिती नसल्याचे सांगितले. अज्ञात चोरट्याने पेटीतील चावी वापरून मंदिराचे कुलूप उघडून दि.१० डिसें २०२५ रोजी सायं ६.३० वाजेपासून ते दि.११ डिसें २०२५ रोजी सकाळी आठ वाजेच्या दरम्यान आत प्रवेश केला. मंदिरातून २० ग्रॅम वजनाची २१०० रु.किमतीची चांदीची साखळी, ३५ ग्रॅम वजनाची ३५०० रु.किमतीची चांदीची पिंड, नऊ किलो वजनाचा ४,५०० रु.किमतीचा पितळी घंटा, १ हजार रु.किमतीची पितळी पंचारती तसेच देवीच्या मूर्तीवरील १ ग्रॅम सोन्याचे ९५०० रु.किमतीचे मणी मंगळसूत्र असा एकूण २०,६०० रू.किमतीचा ऐवज चोरून नेला असे म्हटले आहे. त्यांचे फिर्यादीवरून सायखेडा पोलिस ठाण्यात अज्ञात इसमाच्या विरोधात गु.र.नं. २३३/२०२५ भा.दं.वि. कलम ३०३(२) व ३३१(४) प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच निफाड उपविभागीय पोलीस अधिकारी के. के. पाटील आणि स.पो.नि.संदीप घुगे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. फिंगरप्रिंट युनिट व डॉग स्क्वॉडनेही तपासणी केली असून पुढील तपास पो. हवा. अजय नाईक करीत आहेत.

 

किरणकुमार आवारे

किरणकुमार आवारे हे गेली ३० वर्षांपासून प्रिंट मीडियात काम करत आहेत. याकाळात त्यांनी दैनिक देशदूत, दैनिक लोकमत, दैनिक गांवकरी, दैनिक उलाढाल, दैनिक तरुण भारत, दैनिक सार्वमत, दैनिक आधुनिक केसरी, दैनिक लक्ष महाराष्ट्र, लोकनामा मध्ये काम केले आहे व करत आहेत. दैनिक लोकनामा मध्ये त्यांनी सलग १५० भाग गावगाडा हे सदर चालवले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!