नाशिक ग्रामीण

बिबट्याचा धोका आणि शेतकऱ्यांचे अडचणींशी झुंजणारे वास्तव’

Nandgaon News

‘बिबट्याचा धोका आणि शेतकऱ्यांचे अडचणींशी झुंजणारे वास्तव’

वेगवान मराठी: मारुती जगधने

दि १२ डिसेंबर २०२५

नांदगाव तालुक्यातील सोयगाव, वडाळी, माळेगाव कर्यात, ‘ नारायणगाव, वंजारवाडी आणि लोहशिंगवे या गावांमध्ये सध्या बिबट्याचा वाढलेला वावर ही चिंताजनक गोष्ट आहे. मोकाट कुत्रे तसेच शेतकऱ्यांच्या जनावरांवर झालेले हल्ले हा धोका किती प्रत्यक्ष आहे, याची जाणीव करून देतात. सोयगाव येथील संपत निकुले आणि वडाळी येथील गोरख सानप यांची वासरे बिबट्याने उचलल्याची घटना गावकऱ्यांमध्ये भीती निर्माण करणारी ठरली आहे.

वनपरिक्षेत्र अधिकारी हेमंत कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली वनविभागाने घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केल्यामुळे या घटनांची अधिकृत पुष्टी झाली आहे. माळेगाव आणि वंजारवाडी येथे पिंजरे लावून बिबट्याला जेरबंद करण्याचे प्रयत्न सुरू आहेत; लवकरच वडाळी आणि सोयगाव परिसरातही पिंजरे बसविण्यात येणार आहेत.

परंतु या सर्व प्रयत्नांदरम्यान शेतकऱ्यांची परिस्थिती ‘इकडे आड, तिकडे विहीर’ अशी झाली आहे. एकीकडे बिबट्याची दहशत—तर दुसरीकडे शेतीला पाणी देण्यासाठी रात्रीच्या वेळी दिला जाणारा वीजपुरवठा. बिबट्याच्या वावरामुळे रात्री शेतात जाणे धोकादायक असून, जीव धोक्यात घालून शेतकरी पिकांना पाणी देत आहेत, ही दुर्दैवी वस्तुस्थिती आहे.

वनविभागाच्या सूचनेनुसार जनावरे सुरक्षित ठिकाणी बांधणे, तसेच सायंकाळी किंवा रात्री शेतात एकटे न जाणे, हे उपाय निश्चितच आवश्यक आहेत. पण स्थितीचा मूलभूत उपाय म्हणजे शेतकऱ्यांच्या तातडीच्या मागण्यांकडे लक्ष देणे.

शेतकऱ्यांची मागणी स्पष्ट आहे — रात्रीचा वीजपुरवठा बंद करून, तो दिवसा द्यावा.
बिबट्याच्या वाढत्या हालचालींमुळे हा बदल केवळ सोयीचा नसून अत्यावश्यक ठरत आहे.

शेती, जनावरांची काळजी आणि स्वतःची सुरक्षा या तिन्ही आघाड्यांवर झुंज देणाऱ्या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना शासन व प्रशासनाने त्वरित दिलासा देणे गरजेचे आहे. वनविभागाचे प्रयत्न सुरू असले तरी, वीजपुरवठ्यातील बदल हा शेतकऱ्यांच्या जीवितासंबंधीचा प्रश्न असून त्याकडे विलंब न करता गांभीर्याने पाहिले पाहिजे.

ग्रामीण भागातील सुरक्षिततेसाठी आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी, रात्रीची वीजपुरवठा पद्धत तातडीने बदलून दिवसाची करणे—हीच काळाची गरज आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!