नाशिक ग्रामीणनाशिक शहर

नाशिक ग्रामीण विशेष पथकाची मोठी कारवाई ; पेठ – नाशिक रोडवर कोटंबी घाटात विदेशी दारूची अवैध वाहतूक उघड; तब्बल साडे अठ्ठावीस लाखांचा मुद्देमाल जप्त

वेगवान नाशिक /किरणकुमार आवारे

शिरवाडे वाकद दिनांक ११ डिसेंबर २०२५ :- दमण – दिव येथे तयार होणारी परंतु महाराष्ट्रात विक्रीस बंदी असलेली विदेशी दारू आयशर वाहनातून पेठमार्गे नाशिककडे येत असल्याची गुप्त माहिती नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षकांना मिळाली होती. त्यानुसार ११ डिसेंबर २०२५ रोजी विशेष पथकाने कोटंबी घाटात सापळा रचून कारवाई केली.

मा. पोलीस निरीक्षक रविंद्र मगर यांच्या मार्गदर्शनाखाली पथक क्र. ४ मधील पोलीस उपनिरीक्षक प्रकाश चव्हाणके, पोहवा कैलास रामदास बागुल, पो.कॉ किरण आहेर, पो. कॉ श्रीराम वारुंगसे यांनी नाशिकहून पेठकडे रवाना होत कोटंबी घाटाच्या सुरुवातीस दोन पंचांच्या उपस्थितीत पाहणी सुरू ठेवली.

दरम्यान, सुमारे दुपारी २ वाजण्याच्या सुमारास पेठकडून येणारा चॉकलेटी रंगाचा आयशर (MH-04-LE-6974) संशयास्पद हालचालीसह दिसताच वाहनाला थांबवण्यात आले. चालकाने आपले नाव दिपक संजय काळे (वय २५, रा. बोधेगाव ता. दारवा, जि. यवतमाळ) असे सांगितले. वाहन तपासणीदरम्यान बाहेरून रिकामी दिसणाऱ्या आयशरच्या पुढील बाजूस ड्रायव्हर सीट शेजारी खास तयार केलेला पत्र्याचा कप्पा आढळला.

पंचांसमक्ष त्या कप्प्याची झडती घेतली असता बंदी घातलेल्या विदेशी मद्याचा मोठा साठा मिळून आला. जप्त केलेल्या दारूची एकूण किंमत ₹28,55,440 इतकी असल्याचे प्राथमिक गणना करण्यात आले आहे.

आरोपीस मुद्देमालासह पुढील कारवाईसाठी पेठ पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले असून, शासनमान्य परवानगीशिवाय मद्य वाहतूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

किरणकुमार आवारे

किरणकुमार आवारे हे गेली ३० वर्षांपासून प्रिंट मीडियात काम करत आहेत. याकाळात त्यांनी दैनिक देशदूत, दैनिक लोकमत, दैनिक गांवकरी, दैनिक उलाढाल, दैनिक तरुण भारत, दैनिक सार्वमत, दैनिक आधुनिक केसरी, दैनिक लक्ष महाराष्ट्र, लोकनामा मध्ये काम केले आहे व करत आहेत. दैनिक लोकनामा मध्ये त्यांनी सलग १५० भाग गावगाडा हे सदर चालवले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!