पिंपळस-नैताळे महामार्गावर खड्ड्यांमुळे संताप! युवासेनेचे जिल्हाध्यक्ष विक्रम रंधवे यांचे स्ट्रेचरवर झोपून आंदोलन

वेगवान नाशिक / किरणकुमार आवारे
शिरवाडे वाकद दि.१० ऑक्टो २०२५ :- संभाजीनगर-नाशिक महामार्गावर पिंपळस ते नैताळे दरम्यान असंख्य खड्डे पडल्यामुळे अखेर संतप्त नागरिकांनी शुक्रवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास रस्त्यावर झोपून रास्ता रोको आंदोलन केले. वारंवार इशारा देऊनही हे खड्डे न बुजवल्याने वाहतुकीचा आणि अपघातांचा त्रास वाढला आहे.
महामार्गाचे काँक्रीटीकरण सुरू असून सध्या एकेरी वाहतूक सुरू आहे. या मार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे अपघात वाढले असून अनेक वाहनांचे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर युवासेनेचे जिल्हाध्यक्ष विक्रम रंधवे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. विक्रम रंधवे यांनी अपघातग्रस्तांचा वेदना दर्शवण्यासाठी रस्त्यावर स्ट्रेचरवर झोपून हाताला सलाईन लावून प्रतिकात्मक आंदोलन केले.
या आंदोलनात शिवसेना (ठाकरे गट) चे शिवा सुराशे, संजय कुंदे, गणेश कापसे, सचिन गीते, बापूसाहेब कुंदे, मधुकर शेलार, कैलास धारराव, अमोल वडघुले, विजय झोटिंग, विजय धारराव, सचिन खडताळे, सुनील निकाळे, रत्नाकर गाजरे, दिलीप कापसे, आनंद बिवाल यांच्यासह शिवसेना (ठाकरे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला.
एकही अधिकारी आंदोलनस्थळी न आल्याने संतप्त आंदोलकांनी आंदोलन सुरूच ठेवण्याची भूमिका घेतली. दोन तासांनी अभियंता सोनवणे यांनी भेट देत शनिवारी तहसीलदारांच्या उपस्थितीत बैठक घेण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
◆ बेजबाबदार बांधकाम विभाग
महामार्गावरील खड्डे बुजवण्याची अनेकदा निवेदने देऊनही कारवाई झाली नाही. बीओटी बांधकाम विभागाने या आंदोलनाला सामोरे जाण्याऐवजी अनुपस्थित राहून दुर्लक्ष दाखवले. परिणामी महामार्गावर दोन्ही बाजूंनी ३ ते ४ किमीपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या. पोलीस निरीक्षक गणेश गुरव यांनी विनंती करूनही अधिकारी उपस्थित नसल्याने आंदोलक ठाम राहिले. शेवटी दोन तासांनी अभियंता सोनवणे घटनास्थळी आल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे सुमारे दोन तास वाहतूक खोळंबली.


