नाशिक ग्रामीण

राष्ट्रीय महामार्गाच्या संथ कामामुळे देवळ्यात जीवघेणी कोंडी; पोलीस निरीक्षकांचे प्रशासनाला पत्र

वेगवान नाशिक / बाबा पवार

देवळा : देवळा शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्र. NH 752-G (विंचूर-प्रकाशा महामार्ग) चे काम गेल्या दीड ते दोन वर्षांपासून अतिशय संथ गतीने सुरू असल्याने देवळा शहरवासीयांना आणि प्रवाशांना जीवघेण्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. या गंभीर समस्येकडे त्वरित लक्ष वेधण्यासाठी देवळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सार्थक नेहेते यांनी राष्ट्रीय महामार्ग विभाग, नाशिक यांना लेखी निवेदन सादर केले आहे.

निवेदनात नमूद केल्यानुसार, शहरात रस्त्याचे खोदकाम ठिकठिकाणी केले आहे, मात्र पर्यायी मार्ग नसल्याने दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. यामुळे किरकोळ अपघातांचे प्रमाण वाढले असून पोलीस ठाण्यात नागरिकांच्या तक्रारींचा ओघ वाढला आहे.

सर्वात गंभीर बाब म्हणजे, नंदुरबार, साक्री, पिंपळनेर येथून नाशिकला उपचारांसाठी जाणाऱ्या रुग्णवाहिका या वाहतूक कोंडीत अडकत आहेत. यामुळे वेळेवर उपचार न मिळाल्यास रुग्ण दगावण्याची व त्यातून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची भीती नेहेते यांनी व्यक्त केली आहे.

देवळा-सटाणा मार्गावर मोठी महाविद्यालये व शाळा असल्याने रोज सुमारे पाच ते साडेपाच हजार विद्यार्थी जीव मुठीत घेऊन प्रवास करत आहेत. कोणताही अपघात झाल्यास, त्याची सर्वस्वी जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाची (PWD) राहील, असा स्पष्ट इशाराही पत्रात दिला आहे.

सध्या नवरात्रोत्सवासाठी असलेले होमगार्ड कर्मचारी दि.३ रोजी मुक्त होत असल्याने, तसेच दिवाळी सणादरम्यान मनुष्यबळाची कमतरता लक्षात घेऊन, ठेकेदाराने स्वतःचे जास्तीत जास्त कर्मचारी वाहतूक नियमनासाठी नेमावेत, अशी मागणी नेहेते यांनी केली आहे. नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम करणाऱ्या धुळीच्या प्रदूषणाकडे लक्ष देऊन महामार्गाचे काम अतिजलद गतीने पूर्ण करण्याची मागणी देवळा शहरवासीयांनी केली असल्याचे देखील या अर्जात नमूद केले आहे.

बाबा पवार

गेल्या १७ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. दैनिक देशदूत, लोकमत, आपलं महानगर, नवराष्ट्र, स्वतंत्र भारत आदी दैनिक, AM न्युज TV चॅनल, नाशिक सिटी न्युज आदी इलेक्ट्रॉनिक चॅनल, वेगवान न्यूज तालुका प्रतिनिधी म्हणून कामाचा अनुभव. राजकीय, सामाजिक, गुन्हेगारी, शैक्षणिक, शेती, यशोगाथा, आदी विषयावर विशेष लिखाणाची आवड.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!