नाशिक ग्रामीण

आता विकासासोबतच होणार हिरवाईची जपणुक,पर्यावरण संरक्षणासाठी झाडांचे प्रत्यारोपण

पर्यावरण रक्षणासाठी झाडांचे प्रत्यारोपण, विकासासोबत हिरवाईची जपणूक

वेगवान नाशिक/तुषार रौंदळ
_____________

सटाणा ता.२९सप्टेंबर २०२५ : महाराष्ट्र राज्यातील पायाभूत सुविधांच्या विकासाला वेग मिळत असताना पर्यावरण रक्षणालाही तेवढेच महत्त्व देण्याचे सकारात्मक उदाहरण नामपूर येथे पाहायला मिळाले आहे. आहवा, ताहाराबाद, नामपूर, लखमापूर, मनमाड या प्रस्तावित रस्त्याच्या रुंदीकरण आणि मजबुतीकरणाच्या कामात झाडांच्या रक्षणासाठी प्रत्यारोपणाचा मार्ग स्वीकारण्यात आला आहे.

सध्या सारदे ते लखमापूर (निंबोळा चौफुली) या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम PPCPL नाशिक या कंपनीमार्फत जोमाने सुरू असून, या रस्त्यालगत सुमारे तीनशेहून अधिक विविध प्रजातींची झाडे अडथळा ठरणार होती. मात्र या झाडांना तोडण्याऐवजी, पर्यावरणाच्या दृष्टीने संवेदनशील भूमिका घेत MSIDC आणि महाराष्ट्र वन विभाग यांच्या संयुक्त सहकार्याने आजतागायत यातील सुमारे अडीचशे झाडांचे प्रत्यारोपण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या उपक्रमामागे विकास आणि पर्यावरण यांचा समतोल राखण्याची भूमिका स्पष्ट दिसते. विकासकामांना गती देताना निसर्गाची हानी होणार नाही, यासाठी शासन आणि संबंधित विभागांनी मिळून हे महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. झाडांच्या प्रत्यारोपणासाठी आवश्यक तांत्रिक मदत आणि मार्गदर्शन वन विभागाचे DFO राकेश सेपट (नाशिक), सहाय्यक वनसंरक्षक शेखर तनपुरे (मालेगाव), वन परिक्षेत्र अधिकारी सोमनाथ आमले (सटाणा), वैभव हिरे (मालेगाव) आणि त्यांच्या सहकारी कर्मचाऱ्यांनी दिली. दुसरीकडे, MSIDC चे कार्यकारी अभियंता इम्रान शेख तसेच PPCPL चे प्रशांत शेवाळे, उदय मगर, बाळासाहेब चौधरी व एल. जी. पवार यांनी प्रत्यक्ष सहभागी होत हा उपक्रम यशस्वीपणे राबवला. या उपक्रमासाठी आवश्यक जागा ग्रामपंचायत सारदे (ता.बागलाण) तर्फे उपलब्ध करून देण्यात आली. सरपंच भरत देवरे यांनी दिलेले सहकार्य अत्यंत मोलाचे ठरले. त्यांच्या पुढाकारामुळे प्रत्यारोपणासाठी स्थळाची अडचण दूर झाली. आजवर सुमारे दीडशे झाडांचे प्रत्यारोपण यशस्वीपणे करण्यात आले आहे, आणि उर्वरित झाडांचे प्रत्यारोपण लवकरच पूर्ण होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

चौकट
________

सामाजिक संस्थांचीही साथ

…या कामात स्थानिक सामाजिक संस्था आणि स्वयंसेवी संघटनांचाही मोलाचा सहभाग लाभत आहे. झाडांचे प्रत्यारोपण झालेल्या ठिकाणी संस्थांचे पदाधिकारी भेट देऊन कामाचे कौतुक करत आहेत. स्थानिक पातळीवर नागरिकांमध्येही ‘झाडे लावा, झाडे जगवा’ हा संदेश रुजत आहे.

प्रतिक्रिया
_______

….या उपक्रमामुळे ‘विकास म्हणजे निसर्गविनाश नव्हे’ हा स्पष्ट संदेश जनतेसमोर गेला आहे. भविष्यात राज्यातील इतर प्रकल्पांमध्येही याच पद्धतीचा अवलंब करून विकास व पर्यावरणाचा समन्वय राखण्याचा आदर्श उभा राहू शकतो.

शेखर तनपुरे, सहाय्यक वनसंरक्षक मालेगाव विभाग.

तुषार रौंदळ

पत्रकारिता क्षेत्रात गेल्या २५वर्षापासुन असुन मी दैनिक लोकमत, दैनिक सकाळ, दैनिक दिव्य मराठी,दैनिक गावकरी, दैनिक आपलं महानगर यात पत्रकारिता केली असुन मला राजकीय, सामाजिक आर्थिक, पौराणिक ऐतिहासिक,कला क्रीडा यांचा सखोल अभ्यास केला असुन ते वेळोळी माझ्या लेखणीतून दिसली आहे.तसेच सोशल मीडिया,युटुब चॅनल वर चा मला १०वर्षाचा अनुभव आहे. तुषार रौंदळ हे बागलाण तालुक्यातील सटाणा येथून वेगवान नाशिक चे प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!