भनवड येथे विवाहित तरुणीची निर्घृण हत्या ;पतीवर खुनाचा गुन्हा दाख

वेगवान नाशिक / सागर मोर
वणी :दिंडोरी तालुक्यातील भनवड येथे कौटुंबिक वादातून एका विवाहित तरुणीचा जीव घेणारी भीषण घटना घडली. रोहीणी सागर गांगोडे (वय २२ रा. लोनवाडी, ता. निफाड, जि. नाशिक, ह.मु. भनवड, ता. दिंडोरी) हिची तिच्याच पतीने कात्रीने वार करून हत्या केली.
या प्रकरणी वणी पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे.घडलेला प्रकार असा की दि. २६सप्टेंबर २५ रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास ही घटना घडली. फिर्यादी योगेश प्रकाश धुळे (वय ३२, रा. मनवड, ता. दिंडोरी) यांची बहिण रोहीणी माहेरी भनवड येथे आली होती.
त्याचवेळी तिचा पती सागर शिवाजी गांगोडे (वय २८, रा. लोनवाडी, ता. निफाड) हा तिला घेऊन जाण्यास आला. मात्र, रोहीणीने त्याच्या सोबत जाण्यास नकार दिला. या किरकोळ कारणावरून संतापलेल्या सागरने रोहीणीला शिवीगाळ करून हातचापटीने मारहाण केली.यानंतर संतापाच्या भरात त्याने हातातील कात्रीने रोहीणीच्या छातीवर, पोटावर व कमरेवर सलग वार केले.
गंभीर जखमी अवस्थेत तिला उपचारासाठी नेण्यात आले, मात्र अतिरक्तस्त्रावामुळे तिचा मृत्यू झाला.या घटनेनंतर वणी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३१८/२५भा. दं. सं. २०२३ चे कलम १०३(१), ११५(२), ३५२ अन्वये नोंद करण्यात आला आहे. गुन्हा दाखल करणारे अंमलदार पो.ना. व्ही. जी. साबळे असून, पुढील तपास सपोनि गायत्री एम. जाधव (वणी पोलीस ठाणे) करत आहेत.
या घटनेमुळे भनवड व परिसरात हळहळ व्यक्त होत असून, तरुण विवाहितेची हत्या झाल्याने संतापाचे वातावरण पसरले आहे.



