तरुणांच धाडस.. अंधारलेल्या खडतर १२०फुट खोल विहिरीत उतरत वाचवीला जीव,नागरीकांनी मानले आभार

मुळाणे येथे विहिरीत पडलेल्या मोराला ग्रामस्थ आणि वनविभागाच्या धाडसी प्रयत्नातून जीवदान
वेगवान नाशिक| तुषार रौंदळ
सटाणा दि.२०सप्टेंबर २०२५:-
‘प्रत्येक जीवाला जगण्याचा अधिकार आहे’ हे ब्रीद खरं करून दाखवलं ते बागलाण तालुक्यातील मुळाणे येथील सतर्क नागरिकांनी आणि वनविभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी. शुक्रवार (ता.१९) रोजी गावालगतच्या जंगल परिसरात असलेल्या सुमारे १२० फूट खोल विहिरीत एक मोर पडल्याची घटना घडली. ही विहीर जुनी, झाकण नसलेली आणि अतिशय खोल असल्याने आजूबाजूचे लोक धाडस करत नव्हते. पण अखेर स्थानिक निसर्गप्रेमी आणि वनविभागाच्या संयुक्त प्रयत्नातून या राष्ट्रीय पक्ष्याला सुखरूप वाचवण्यात यश आले.
मोर विहिरीत पडल्याचे लक्षात येताच निसर्ग व प्राणीमित्र राकेश घोडे यांनी याची माहिती सटाणा वनपरिक्षेत्र अधिकारी सोमनाथ आमले यांना दिली. त्यांनी तत्काळ प्रतिक्रिया देत वनमजूर किरण यांना घटनास्थळी पाठवले. विहीर खोल आणि पाण्याने भरलेली असल्याने मोर जिवाच्या झुंजीत होता. मात्र वेळेवर मदत पोहोचल्याने आणि ग्रामस्थांची एकजूट झाल्याने त्याचा जीव वाचला. मोराला विहिरीतून बाहेर काढणे ही सोपी गोष्ट नव्हती. विहीर १२० फूट खोल, अंधारलेली आणि खडतर होती. मात्र बुरा पवार आणि विनोद जगताप या दोघांनी कोणतीही भीती न बाळगता स्वतःचा जीव धोक्यात घालून विहिरीत उतरले. दोघांचे धाडस आणि शौर्य कौतुकास्पद आहे. त्यांनी आपल्या कुवतीवर विश्वास ठेवत, मनात प्राण्याविषयी प्रेम ठेवून मोराला जिवंतपणे वर काढले. उपस्थित सर्वांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचे अभिनंदन केले. या बचाव मोहिमेत ग्रामपंचायत मुळाणेचे सरपंच संदीप निकम, भाऊसाहेब खरे, गणेश नाडेकर, भैया शिंदे, तुषार जगताप, भूषण देवरे, लक्ष्मण मोरे, राजू पवार, भूषण जगताप, तसेच बागलाण वनविभाग, निसर्ग मित्र मंडळ, आणि अनेक स्थानिक ग्रामस्थ सहभागी झाले. सर्वांनी एकत्र येऊन दाखवलेली ही एकजूट आणि निसर्गप्रेम समाजासाठी प्रेरणादायी आहे.
प्रतिक्रिया
_________
…मुळाणे गावातील या धाडसी घटनेने संपूर्ण परिसरात नवा आदर्श निर्माण केला आहे. आज विहिरीतून वाचलेला मोर हा फक्त एक पक्षी नाही, तर मानवतेच्या आणि निसर्ग प्रेमाच्या भावनेचा एक जिवंत प्रतीक ठरला आहे.
राकेश घोडे, निसर्ग व प्राणीमित्र बागलाण.



