नाशिक ग्रामीणमहाराष्ट्र,देश

शिक्षक बदलीनंतरची शाळांची स्थिती – विद्यार्थ्यांचे काय?

Nandgaon news

शिक्षक बदलीनंतरची शाळांची स्थिती – विद्यार्थ्यांचे काय?

वेगवान मराठी : मारुती जगधने

[दि 20 सप्टेंबर 2025 ]

नाशिक जिल्ह्यातील ३,२६३ शाळांमध्ये तब्बल ११,२०२ शिक्षक पदे मंजूर आहेत. त्यापैकी ३,८४८ शिक्षकांची बदली प्रक्रिया पूर्ण झाली आहे. शिक्षण विभागाने ही प्रक्रिया राबवताना अनेक बाबींचा विचार केला असला तरी प्रत्यक्षात शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता व विसंगती निर्माण झालेली दिसते. काही तालुक्यांमध्ये शिक्षक “जास्त” झाले आहेत, तर काही तालुक्यांमध्ये “कमतरता” जाणवते.

उदा. सुरगाणा, नांदगाव, पेठ या डोंगराळ भागातील शाळांमध्ये मोठ्या प्रमाणावर शिक्षक कमी झाले आहेत. या भागातील विद्यार्थी आधीच शैक्षणिक दृष्टीने मागास आहेत. त्यातच “नको तेच वाडे” असा प्रकार घडल्याने शिक्षक टाळाटाळ करतात आणि शाळा रिकाम्या राहतात. परिणामी ग्रामीण व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या संधी मर्यादित राहतात. दुसरीकडे नाशिक शहर व इगतपुरीसारख्या ठिकाणी शिक्षक तुलनेने जास्त झाले आहेत.

ही परिस्थिती शिक्षणातील समानतेच्या तत्त्वाला तडा देणारी आहे. एका बाजूला शहरातील मुलांना मुबलक शिक्षक उपलब्ध होतात, तर दुसरीकडे दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शिक्षकांअभावी अभ्यास अपूर्ण राहतो. आजच्या स्पर्धेच्या युगात ही तफावत विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी धोकादायक आहे.

यासाठी काही उपाय तातडीने करणे गरजेचे आहे –

दुर्गम भागातील शिक्षकांना आवश्यक सुविधा व प्रोत्साहन द्यावे.
शाळांची वास्तविक गरज लक्षात घेऊन संतुलित बदली प्रक्रिया राबवावी.
“शिक्षक जास्त – शिक्षक कमी” या समस्येवर तातडीने पुनर्वाटप करावे.
विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून तात्पुरते शिक्षक नेमणे आवश्यक आहे.
शिक्षण हा प्रत्येक मुलाचा हक्क आहे. शिक्षकांची बदली ही फक्त फाईलीवरची आकडेवारी न राहता, विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करणारी ठरली पाहिजे. अन्यथा, बदलीच्या गोंधळात विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात ढकलले जाईल.

प्रश्न असा आहे की – “शिक्षकांची कमतरता असलेल्या शाळांकडे शासनाचे लक्ष केव्हा वळणार?”

नाशिक
जिल्हा परिषदेच्या बदली प्रक्रियेअंतर्गत जिल्ह्यातील शिक्षकांचे तब्बल ३,८४८ आदेश प्रसिद्ध झाले असून, अनेक शाळांमध्ये पदवितर व उपशिक्षकांच्या जागा रिक्त राहिल्या आहेत. या बदल्यांमुळे शहरी तसेच ग्रामीण भागातील शिक्षण व्यवस्थेत तात्पुरते विस्कळीतपणा निर्माण झाला आहे.

जिल्ह्यात एकूण ३,२६३ शाळा असून त्यामध्ये १२,२०२ शिक्षक पदे आहेत. मात्र त्यापैकी कार्यरत शिक्षकांची संख्या १०,३४५ एवढी होती. बदली आदेश निघाल्यानंतर अनेक शाळांमध्ये शिक्षकांच्या संख्येत तफावत राहिली आहे.

प्राथमिक शिक्षण विभागाने जुलैपासून बदली प्रक्रिया सुरू केली होती. दिर्घकाळ सेवा, पती-पत्नी एकत्रीकरण, दूरस्थ आजार अशा विविध निकषांवर बदली करण्यात आली. परंतु बदलीनंतर काही तालुक्यांमध्ये शिक्षकांची कमतरता तीव्र झाली आहे.

तालुकानिहाय स्थिती :
बागलाण : ७५७ कार्यरत शिक्षकांपैकी २२७ जणांची बदली झाली; आता ३० शिक्षक कमी
चांदवड : ३५२ कार्यरत, २३५ बदली; २२ शिक्षक जास्त
देवळा : ३२२ कार्यरत, २५० बदली; २ शिक्षक कमी
दिंडोरी : ६८९ कार्यरत, ३७७ बदली; ९ शिक्षक कमी
इगतपुरी : ५०३ कार्यरत, ३०७ बदली; ४ शिक्षक कमी
कळवण : ४७३ कार्यरत, ३६६ बदली; १५ शिक्षक कमी
मालेगाव : १,९१२ कार्यरत, ८३० बदली; १२ शिक्षक कमी
नांदगाव : ७२८ कार्यरत, ३३० बदली; ३ ४ शिक्षक कमी
नाशिक : ९४९ कार्यरत, ३७२ बदली; २० शिक्षक जास्त
निफाड : ६५० कार्यरत, ४५८ बदली; ९ शिक्षक कमी
पेठ : ४८२ कार्यरत, ३५६ बदली; ३ शिक्षक कमी
सिन्नर : ९३० कार्यरत, ५७६ बदली; ११ शिक्षक कमी
सुरगाणा : ५७७ कार्यरत, २८५ बदली; ३५ शिक्षक कमी
त्र्यंबकेश्वर : ५९१ कार्यरत, ३२७ बदली; १२ शिक्षक कमी
येवला : ६६९ कार्यरत, ३०४ बदली; १० शिक्षक कमी ( कमी जास्त आसतील )
परिणाम :
सुरगाणा, नांदगाव व डोंगराळ भागातील शाळा : “नको रे बाबा” म्हणत शिक्षक बदलीस नकार देतात. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर गंभीर परिणाम होतो.
शिक्षक बदलल्यामुळे काही ठिकाणी वर्ग रिकामे राहिले तर काही शाळांत एकाच शिक्षकावर संपूर्ण जबाबदारी आली आहे.
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक परिणामांवर त्याचा विपरीत परिणाम होईल, अशी भीती पालक व स्थानिकांमध्ये आहे.
शिक्षक संघटनांचा संताप :
रिक्त जागा त्वरित भरण्याची प्रक्रिया सुरू करावी, अन्यथा शिक्षणाची गुणवत्ता घसरल्याची जबाबदारी प्रशासनावर राहील, असा इशारा शिक्षक संघटनांनी दिला आहे.

एकंदरीत, नाशिक जिल्ह्यातील बदली प्रक्रियेने शाळांमधील शिक्षक संख्येचा समतोल बिघडला असून तातडीने नव्या नियुक्त्या व पुनर्वाटपाची आवश्यकता आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!