वेळेने साधला मेळ..मात्र दैवाने दिली हुल , सटाण्यात मोठा अनर्थ टळला

वेगवान नाशिक/तुषार रौंदळ
सटाणा दि.३०ऑगस्ट२०२५: – साक्री शिर्डी महामार्गालगत सटाणा शहराच्या मध्यवर्ती भागातील बस स्थानकाच्या शेजारी असलेल्या प्रभाकर प्लाझा येथील वीज वितरण कंपनीच्या ट्रान्सफॉर्मरला रात्री मिरच्या घेऊन जाणाऱ्या पिकअप गाडीने जबर धडक दिली. या धडकेत पिकअप गाडी पलटी झाली असून ट्रान्सफॉर्मरचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने हा अपघात रात्रीच्या वेळेस घडल्याने जीवितहानी टळली आहे.
हा वीज वितरण कंपनीचा ट्रान्सफॉर्मर साक्री शिर्डी रस्त्यालगत असून त्याच्या अगदी शेजारी शॉपिंग कॉम्प्लेक्स, खाजगी दवाखाने आणि बसस्थानक आहे. त्यामुळे दिवसभर या भागात विद्यार्थ्यांची व नागरिकांची मोठी वर्दळ असते. याआधीही या ट्रान्सफॉर्मर शॉर्टसर्किटमुळे आगीचे गोळे पडून आग लागल्याच्या घटणा घडल्या आहेत. दवाखाने,बस स्थानक , शॉपिंग मॉल त्यामुळे नागरिक वस्तू खरेदी, पेशंट ने आण करण्याकरिता नागरिक ट्रान्सफॉर्मरच्या खालीच वाहने पार्क करतात, त्यामुळे अशा प्रकारचा अपघात किंवा आग लागल्यास स्थानिक नागरीकांमध्ये भिती निर्माण होते. तर तासंतास वाहातूकही ठप्प होऊन जाते.
प्रभाकर प्लाझा कॉम्प्लेक्सचे मालक विशाल सोनवणे आणि आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी यापूर्वीही
संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार करून या डीपीला योग्य संरक्षण व्यवस्था करून देण्याची मागणी केली होती. मात्र, अद्यापपर्यंत कोणतीही कार्यवाही झालेली नाही.
या अपघातामुळे ट्रान्सफॉर्मरचे नुकसान झाले असून परिसरातील वीज पुरवठाही काही काळ विस्कळीत झाला होता. या पार्श्वभूमीवर विशाल सोनवणे व कॉम्प्लेक्समधील गाळेधारकांनी ही धोकादायक ट्रान्सफॉर्मर दुसऱ्या सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्याची मागणी केली आहे.
विद्युत महामंडळाने या घटनेची गंभीर दखल घेऊन त्वरित उपाययोजना कराव्यात, अन्यथा भविष्यात मोठा अनर्थ घडल्यास त्याला विज महामंडळ जबाबदार राहील असा इशारा गाळे धारक व व्यवसायिकांनी दिला आहे.



