नाशिक ग्रामीण

द्राक्ष हंगामाच्या सुरवातीलाच गालबोट, जिल्ह्यात या ठिकाणी बोगस कृषी रसायनांच्या विक्री प्रकरणी गुन्हा

वेगवान नाशिक / किरणकुमार आवारे

शिरवाडे वाकद, दि. २७ ऑगस्ट २०२५ :-
द्राक्ष हंगामाला सुरुवात होत असतानाच निफाड तालुक्यात बोगस व विनापरवाना कीटकनाशके व जैवउत्तेजकांची अवैध विक्री सुरू असल्याचा प्रकार उघडकीस आला. जिल्हा भरारी पथकाच्या धाडीत तब्बल १ लाख ६९ हजार ९०४ रुपयांचा मुद्देमाल जप्त झाला असून या प्रकरणी तिघांविरोधात ओझर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भरारी पथकाचे प्रमुख कृषी विकास अधिकारी संजय शेवाळे, जिल्हा गुणवत्तानियंत्रण निरीक्षक डॉ. जगन सूर्यवंशी आणि निफाडचे कृषी अधिकारी गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक राहुल धनगर यांनी ही कारवाई केली. त्यांना सहाय्यक व्यवस्थापक सतीश पिसाळ (ट्रूबडी कन्सल्टिंग प्रा.लि., दिल्ली) यांनी बनावट ग्राहक बनून साथ दिली.

कारवाईदरम्यान बायर क्रॉप सायन्स कंपनीचे ‘लुना’ व ‘नेटिवो’, सिजेंटा कंपनीचे ‘स्कोर’ ही बुरशीनाशके तर ‘इसाबिऑन’ व ‘बायो-आर ३०३’ अशी जैवउत्तेजके आढळली. मात्र आरोपींकडे कोणतेही पक्के बिल वा परवाना नव्हता. त्यामुळे संपूर्ण साठा पंचनामा करून जप्त करण्यात आला असून नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले आहेत.

संशयित आरोपी गोविंद भामरे, वैभव यादवराव सोनवणे व कुलकर्णी (पुणे) यांनी बेकायदेशीर विक्री करून शेतकऱ्यांची दिशाभूल केल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे त्यांच्यावर किटकनाशक कायदा 1968, किटकनाशक नियम 1971, पर्यावरण संरक्षण कायदा 1986, अत्यावश्यक वस्तु कायदा 1955, खत नियंत्रण आदेश 1985 तसेच भारतीय न्याय संहिता 2023 मधील तरतुदीनुसार गुन्हा नोंदवला आहे.

या कारवाईसाठी पंच म्हणून अमोल सोमवंशी (सहाय्यक कृषी अधिकारी, निफाड), योगेश गंगाधर निरभवने (कसबे सुकेणे) आणि सतीश तानाजी पिसाळ यांनी काम पाहिले. ही कारवाई विभागीय कृषी सहसंचालक सुभाष काटकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविंद्र माने, जिल्हा परिषद कृषी विकास अधिकारी संजय शेवाळे व तालुका कृषी अधिकारी सुधाकर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

शेतकरी बांधवांनी कीटकनाशके व जैवउत्तेजके फक्त अधिकृत विक्रेत्यांकडून पक्के बिल घेऊनच खरेदी करावीत, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविंद्र माने यांनी आवाहन केले आहे. तर तालुक्यातील शेतकऱ्यांनी परवानाधारक कृषी सेवा केंद्रातूनच खते-कीटकनाशके खरेदी करावीत, बेकायदेशीर विक्रेत्यांच्या आमिषाला बळी पडू नये, असे आवाहन निफाडचे कृषी अधिकारी राहुल धनगर यांनी केले आहे.

 

किरणकुमार आवारे

किरणकुमार आवारे हे गेली ३० वर्षांपासून प्रिंट मीडियात काम करत आहेत. याकाळात त्यांनी दैनिक देशदूत, दैनिक लोकमत, दैनिक गांवकरी, दैनिक उलाढाल, दैनिक तरुण भारत, दैनिक सार्वमत, दैनिक आधुनिक केसरी, दैनिक लक्ष महाराष्ट्र, लोकनामा मध्ये काम केले आहे व करत आहेत. दैनिक लोकनामा मध्ये त्यांनी सलग १५० भाग गावगाडा हे सदर चालवले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!