सटाणा ग्रामीण रुग्णालयाचा प्रश्न ऐरणीवर, शिवसेनेच्या वतीने वैद्यकीय अधिकाऱ्यांना घेराव घालत आंदोलन

वेगवान नाशिक
विरगांव दि.२१ऑगस्ट २०२५ :-ग्रामीण रुग्णालय व ट्रॉमा केअर सेंटरमध्ये भेडसावणाऱ्या गंभीर समस्या आणि अनागोंदी कारभाराविरोधात शहर व बागलाण तालुका शिवसेना उद्धव ठाकरे पक्षातर्फे गुरुवार (दि.२१)रोजी जेष्ठ नेते लालचंद सोनवणे, तालुकाप्रमुख डॉ. प्रशांत सोनवणे व शहर प्रमुख रवींद्र सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप भगत यांना घेराव घालत तीव्र आंदोलन छेडण्यात आले.तसेच येत्या सात दिवसात कामकाजात सुधारणा करावी अन्यथा कोणतीही पूर्वसूचना न देता रस्त्यावर उतरून तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे.
शिवसैनिकांनी रुग्णालयाच्या आवारात दाखल होत घोषणाबाजी सुरू केली. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी ग्रामीण रुग्णालयातील नवजात बालकांचे लसीकरण सत्र पूर्वी आठवड्यातून दोनदा होत असताना मागील सहा महिन्यांपासून फक्त मंगळवारीच घेतले जात असल्याने माता-भगिनींना व लहान बालकांना मोठ्या प्रमाणावर गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. आवारात ट्रॉमा केअर सेंटरची इमारत उभी असूनही गेल्या सात-आठ वर्षांत त्याचे कार्यान्वयन झालेले नाही. हाडांचे ऑर्थोपेडिक शस्त्रक्रिया अद्याप सुरू झालेल्या नाहीत. स्वच्छतेचा गंभीर अभाव, पुरेसे वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी नसणे, रुग्णांना मुद्दाम खाजगी दवाखान्यांकडे वळवणे या गंभीर तक्रारींवर संताप व्यक्त करण्यात आला.
आंदोलनात ज्येष्ठ नेते लालचंद सोनवणे, तालुकाप्रमुख डॉ. प्रशांत सोनवणे, तालुका उपाध्यक्ष राजेंद्र खानकरी, राजनसिंह चौधरी, जिल्हा संघटक अमोल पगार, अनिल सोनवणे, शरद शेवाळे, लक्ष्मण सोनवणे, पंकज ठाकूर, सुनील गायकवाड, संदीप सोनवणे, सुनील गायके, मंगलसिंग जोहरी यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक सहभागी होते.
प्रतिक्रिया:-
वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप भगत यांनी, आठवड्यातील दोन दिवस लसीकरण मोहीम पूर्ववत पुन्हा सुरू केली जाणार असून रुग्णवाहिकांच्या दुरुस्तीसह अतिरिक्त कर्मचारी व नवीन रुग्णवाहिकेसाठी शासनस्तरावर पाठपुरावा सुरू आहे.
डॉ.संदिप भगत , वैद्यकीय अधिकारी,सटाण
सटाणा उपजिल्हा रुग्णालय हे गोरगरीब रुग्णांसाठी रुग्णांसाठी मोठा आधार असायला हवे होते. परंतु इथे फक्त इमारत उभी आहे. डॉक्टर नाहीत, सुविधा नाहीत, स्वच्छता नाही. रुग्णांना सरकारी रुग्णवाहिका असूनही खाजगी रुग्णवाहिकावाल्यांकडे पाठवले जाते. हे खपवून घेतले जाणार नाही. जर सात दिवसांत सुधारणा झाली नाही तर आम्ही शिवसेना स्टाईलने रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडू.
– शिवसेना शहर प्रमुख रवींद्र सोनवणे



