नाशिक ग्रामीण

या ठिकाणी ग्रामसेवकाचा निरोप समारंभ ठरला अनोखा; घोड्यावरून काढली मिरवणूक

वेगवान नाशिक / किरणकुमार आवारे

शिरवाडे वाकद दि.१८ ऑगस्ट २०२५ :- संपूर्ण गांव गोळा झालं, सडा रांगोळीने गल्ल्या सजल्या, शेकडो गावकरी डोळ्यांत अश्रू घेऊन उभे होते; महिलांनी औक्षणासाठी पात्र आणली होती, तरुणांनी फुलांच्या वर्षावात घोड्यावरून सवाद्य मिरवणुक काढली.. विकासाचा खरा साथीदार अंतरवेलीचा ग्रामसेवक अशा थाटामाटात निरोप घेताना दिसला.

गावचा चालक चांगला असेल तर गावाचा विकास नक्कीच होतो, ही म्हण अंतरवेली, ता. निफाड या गावाने प्रत्यक्ष अनुभवली. ग्रामसेवक संदीप प्रल्हाद पाटील यांनी २०१६ पासून आजवर केलेल्या कामगिरीमुळे गावाचा चेहरामोहरा बदलला. त्यांच्या बदलीची बातमी समजताच ग्रामस्थांनी भावनिक निरोप देत घोड्यावरून सवाद्य मिरवणुकीतून त्यांचा गौरव केला.

गावकऱ्यांनी निरोप समारंभाची खास आखणी केली. गावभर रांगोळ्या, फ्लेक्स, फुलांच्या पाकळ्यांनी स्वागत, डीजे, भरजरी फेटा व घोड्यावरून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. तब्बल ७० ते १०० महिलांनी औक्षण केले. यावेळी अबालवृद्दांचे डोळे पाणावले. गावकऱ्यांनी शाल, श्रीफळ, भेटवस्तू देऊन भावनिक निरोप दिला.

गावाची लोकसंख्या १४६४ असून ३२० कुटुंबांची वस्ती आहे. पूर्वी गावात वैयक्तिक शौचालयांचा अभाव होता. पाटील यांनी स्वच्छ भारत मिशन अंतर्गत वैयक्तिक शौचालये उभारून गावाला हागणदारी मुक्त दर्जा मिळवून दिला. पाण्याच्या कृत्रिम टंचाईवर मात करत जल जीवन मिशन योजनेतून ‘हर घर नल, हर घर जल’ ही योजना पूर्ण केली. अंगणवाडी, ग्रामपंचायत भवन, शाळा, वाचनालय यांचे पुनरुज्जीवन, वृक्षारोपण, गावातील रस्त्यांचे काँक्रीटीकरण, भूमिगत गटार व विद्युतीकरण अशी कामे त्यांच्या काळात झाली.

गावाला तंटामुक्त गाव पुरस्कार, हागणदारी मुक्त गाव पुरस्कार, प्लास्टिक मुक्त गाव पुरस्कार, संत गाडगे बाबा ग्रामस्वच्छता अभियान पुरस्कार, आदर्श गाव पुरस्कार असे अनेक सन्मान मिळाले. या कामगिरीची दखल घेऊन पाटील यांना महाराष्ट्र शासनाचा ‘आदर्श ग्रामसेवक पुरस्कार २०२०/२१ व पुणे पत्रकार प्रतिष्ठान अंतर्गत नालंदा ऑर्गनायझेशन तर्फे ‘महाराष्ट्र रत्न सन्मान सोहळा पुरस्कार २०२५’ प्राप्त झाला.

◆ मी गावासाठी केलेली सेवा सार्थकी लागली, हेच माझ्यासाठी मोठे समाधान आहे. या प्रवासात त्यांना राष्ट्रीय सरपंच परिषदेचे उपाध्यक्ष, ग्रामपंचायतचे आजी, माजी सरपंच, उपसरपंच, सदस्य, तंटामुक्त अध्यक्ष, सचिव, सेवा सोसायटी पदाधिकारी, पोलिस पाटील, मुख्याध्यापक, शिक्षक, अंगणवाडी कर्मचारी, ग्रामपंचायत कर्मचारी, रोजगार सेवक व ग्रामस्थ यांची खंबीर साथ लाभली.
संदीप पाटील
ग्रामसेवक

किरणकुमार आवारे

किरणकुमार आवारे हे गेली ३० वर्षांपासून प्रिंट मीडियात काम करत आहेत. याकाळात त्यांनी दैनिक देशदूत, दैनिक लोकमत, दैनिक गांवकरी, दैनिक उलाढाल, दैनिक तरुण भारत, दैनिक सार्वमत, दैनिक आधुनिक केसरी, दैनिक लक्ष महाराष्ट्र, लोकनामा मध्ये काम केले आहे व करत आहेत. दैनिक लोकनामा मध्ये त्यांनी सलग १५० भाग गावगाडा हे सदर चालवले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!