नाशिक ग्रामीण

निफाड तालुक्यात या ठिकाणी शिक्षक पत्नीची आत्महत्या, सासरच्यांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा माहेरच्यांचा आरोप

वेगवान नाशिक / किरणकुमार आवारे

शिरवाडे वाकद दि.१२ ऑगस्ट २०२५ :- निफाड तालुक्यातील धारणगाव खडक येथील ३८ वर्षीय शिक्षक पत्नी शितल भाउसाहेब पगारे हिने घराच्या लोखंडी अँगलला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेनंतर माहेरच्या मंडळींनी पतीचे अनैतिक संबंध आणि सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या छळामुळेच आत्महत्या घडल्याचा गंभीर आरोप केला आहे.
या प्रकरणी राहुल यशवंत भोसले, वय २३, रा. पिंपळस रामाचे, ता. निफाड यांनी लासलगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत, मयत शितलचा विवाह दि.२ मार्च २००८ रोजी भाऊसाहेब मधुकर पगारे यांच्याशी झाला. विवाहानंतर आज पावेतो सासू मंदाबाई मधुकर पगारे, दीर राहुल मधुकर पगारे, मामा सासरे सुरेश मोतीराम सोनवणे आणि पती भाऊसाहेब यांनी संगनमत करून वेळोवेळी तिचा शारीरिक व मानसिक छळ केला.
हुंड्याच्या कारणावरून तसेच पहिली अपत्य मुलगी झाल्याने ‘तुला घरातील काम नीट जमत नाही’ अशा टोमण्यांनी तिचा अपमान केला जात असे. हाताने मारहाण, शिवीगाळ, दमदाटी यासह पतीने विवाहबाह्य संबंध ठेवून वारंवार आत्महत्येस प्रवृत्त केले. त्यामुळेच दि. ११ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी १०.३० वाजता शितलने गळफास घेतला असे म्हटले आहे.
या फिर्यादीवरून लासलगाव पोलीस ठाण्यात गु.र.नं. १९४/२०२५ भा.न्या.सं.कलम १०८, ८५, ११५(२), ३५२, ३५१(२) तसेच महिलांवरील अत्याचार प्रतिबंधक कायद्यातील कलम ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील पती भाऊसाहेब पगारे, राहुल पगारे व सुरेश सोनवणे या तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. स.पो.नि. भास्करराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक किरण साळुंखे अधिक तपास करीत आहेत.

◆ सदर घटनेने परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला होता. घटनेची माहिती मिळताच लासलगाव पोलीस ठाण्याचे स.पो.नि. भास्कराव शिंदे, पो.उपनिरीक्षक पवन सुपनर, किरण साळुंखे, पो.हवा. संदीप शिंदे, बाळासाहेब कांदळकर, औदुंबर मुरडनर, अविनाश सांगळे, सागर आरोटे, पो.पा.राहुल सोनवणे आदींच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. माहेरच्यांनी आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली. पोलिसांनी अटक करण्याचे आश्वासन दिल्यानंतर रात्री दोन वाजता मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

किरणकुमार आवारे

किरणकुमार आवारे हे गेली ३० वर्षांपासून प्रिंट मीडियात काम करत आहेत. याकाळात त्यांनी दैनिक देशदूत, दैनिक लोकमत, दैनिक गांवकरी, दैनिक उलाढाल, दैनिक तरुण भारत, दैनिक सार्वमत, दैनिक आधुनिक केसरी, दैनिक लक्ष महाराष्ट्र, लोकनामा मध्ये काम केले आहे व करत आहेत. दैनिक लोकनामा मध्ये त्यांनी सलग १५० भाग गावगाडा हे सदर चालवले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!