मेशी येथे भरदिवसा धाडसी चोरी: लाखो रुपयांचा ऐवज लंपास

देवळा : तालुक्यातील मेशी गावात दिवसाढवळ्या एका घरात चोरी झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून तीन तोळे सोने आणि लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे आहे की, सौंदाणे-देवळा रस्त्यावर मेशी शिवारात राहणारे नामदेव वेडू शिरसाठ हे रविवार, १० तारखेला सकाळी १० वाजता कुटुंबासह बहिणीच्या घरी वाखारवाडी येथे गेले होते. घराला कुलूप लावून गेल्यावर, ते दुपारी तीन वाजता परत आले असता त्यांना घराचे कुलूप तुटलेले आणि दरवाजा फक्त कडी लावून बंद केलेला दिसला. त्यांनी दरवाजा उघडून पाहिले असता, घरातील कपाटाचे सामान अस्ताव्यस्त पडलेले होते. घरातून दोन लाख वीस हजार रुपयांची रोकड आणि तीन तोळे सोने असा एकूण ऐवज चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले.
शिरसाठ यांनी तातडीने आजूबाजूच्या शेतकऱ्यांना बोलावून माहिती दिली आणि त्यानंतर देवळा पोलिसांशी संपर्क साधला. माहिती मिळताच, देवळा पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक नंदा पाटील, उपनिरीक्षक मनोज कुवर आणि त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनेचा पंचनामा केला असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक सार्थक नेहेते यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक नंदा पाटील आणि हवालदार संदीप चौधरी करत आहेत.



